Corona Virus in Nagpur; जयपूूरमध्ये अडकलेली महिला सुखरुप पोहोचली नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 01:12 PM2020-03-26T13:12:04+5:302020-03-26T13:13:23+5:30
चुकीच्या गाडीत बसल्यामुळे जलालखेडा येथील एक महिला जयपूरला पोहोचली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांंच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावर अडकली. परंतु जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी या महिलेची दखल घेऊन तिला अनुव्रत एक्स्प्रेसने नागपुरला पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चुकीच्या गाडीत बसल्यामुळे जलालखेडा येथील एक महिला जयपूरला पोहोचली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांंच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावर अडकली. परंतु जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी या महिलेची दखल घेऊन तिला अनुव्रत एक्स्प्रेसने नागपुरला पाठविले.
जलालखेडा येथील एक ३२ वर्षांंची महिला रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या महिलेला रेल्वेगाडी क्रमांक १२५७८ म्हैसुर-दरभंगा या गाडीने दरभंगा येथे जायचे होते. याच वेळी बाजुच्या प्लॅटफार्मवर रेल्वेगाडी क्रमांक १२९७५ म्हैसुर-जयपूर लागली होती. चुकीने ही महिला म्हैसुर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसली. चुकीने ती जयपूरला पोहोचली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावरच अडकली होती. ही बाब जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच या महिलेची दखल घेतली. सध्या ठिकठिकाणी अडकून पडलेल्या रेल्वेगाड्या आपल्या मुळ स्थानकांवर रिकाम्या जात आहेत. त्यामुळे जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी पुढाकार घेऊन नागपूरमार्गे रिकाम्या जात असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२६३२ बीकानेर-मदुराई अनुव्रत एक्स्प्रेसमध्ये या महिलेला बसवून दिले. बुधवारी दुपारी ३.४५ वाजता ही महिला नागपूर रेल्वेस्थानकावर उतरली. उतरताच रेल्वेस्थानकावर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांनी या महिलेचे आणि तिच्या मुलाचे तापमान घेतले. त्यांची प्रकृती सामान्य असल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर सोडण्यात आले.
महिलेला घेण्यासाठी जयपूरला गेला दुचाकीने
जयपूर रेल्वेस्थानकावर आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह अडकून पडल्यानंतर या महिलेने जलालखेडा येथील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर या महिलेच्या आत्याचा मुलगा दुचाकीने जयपूरला गेला. परंतु तेथील स्टेशन व्यवस्थापकांनी या तिघांनाही अनुव्रत एक्स्प्रेसने पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जवळील दुचाकीही अनुव्रत एक्स्प्रेसमध्ये टाकून त्यांना नागपुरला रवाना करण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तिघेही दुचाकीने जलालखेडाकडे रवाना झाले.