ट्रॉमा केअर सेंटर : मृत्यूच्या दारातून परतली गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:25 PM2019-04-01T22:25:55+5:302019-04-01T22:27:23+5:30

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांना आला. एका भीषण अपघातात सात महिन्याच्या गर्भवतीचे डोके रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार आदळले. डोके फाटून ती कोमात गेली. त्याच अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत तातडीने मेंदूवर शस्त्रक्रिया केली. तब्बल आठ दिवस बेशुद्धावस्थेत व्हेंटिलेटरवर होती. या दरम्यान पोटातील बाळाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता होती. परंतु न्यूरोसर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ‘क्रिटिकल केअर सर्व्हिस’मुळे २८ दिवसानंतर ती धोक्याबाहेर आली. डॉक्टरांचे प्रयत्न व दैव बलवत्तर होते म्हणून तिचे आणि पोटातील बाळाचे प्राण वाचले.

Trauma Care Center: Pregnant back from the door of death | ट्रॉमा केअर सेंटर : मृत्यूच्या दारातून परतली गर्भवती

शर्तीच्या उपचारानंतर बरी झालेली मोनिका, सोबत तिची आई, सासू व डॉ. मोहम्मद फैझल.

Next
ठळक मुद्देडॉक्टरांचे प्रयत्न व दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचला दोघांचा जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांना आला. एका भीषण अपघातात सात महिन्याच्या गर्भवतीचे डोके रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार आदळले. डोके फाटून ती कोमात गेली. त्याच अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत तातडीने मेंदूवर शस्त्रक्रिया केली. तब्बल आठ दिवस बेशुद्धावस्थेत व्हेंटिलेटरवर होती. या दरम्यान पोटातील बाळाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता होती. परंतु न्यूरोसर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ‘क्रिटिकल केअर सर्व्हिस’मुळे २८ दिवसानंतर ती धोक्याबाहेर आली. डॉक्टरांचे प्रयत्न व दैव बलवत्तर होते म्हणून तिचे आणि पोटातील बाळाचे प्राण वाचले.
मोनिका निखिल लांडगे (२५) रा. ताजबाग असे त्या गर्भवतीचे नाव. ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मोनिका ताजबाद चौकात उभी होती. याच दरम्यान ट्रिपल सीटवर भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस्वाराने मोनिकाला जोरदार धडक दिली. मोनिका रस्ता दुभाजकावर फेकल्या गेली. डोके फाटले. रक्ताच्या थारोळ्यातच नातेवाईकांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जीव वाचण्याची शक्यता कमी असल्याने तिला मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. रात्री ८.३० वाजता मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तिला दाखल केले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात सेंटरचे प्रमुख व आर्थाेपेडिक सर्जन डॉ. मोहम्मद फैजल, न्यूरोसर्जन डॉ. पवित्र पटनाईक व डॉ. अंकुर सांगवी, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. सोमा चाम, डॉ. प्रदीप ढुमणे व डॉ. वैद्य यांनी तातडीने मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. परंतु गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेत तिला व पोटातील बाळाच्या जीवाला धोका होता. डॉक्टरांनी याची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. त्यांच्याकडून होकार मिळताच रात्री १२ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली.
आठ दिवस होती व्हेंटिलेटरवर
तीन तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी ती पुढे कोमात जाण्याची, कायमस्वरुपी मेंदू ‘डॅमेज’ होण्याची किंवा मानसिक रुग्ण होण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेनंतर ती बेशुद्धावस्थेतच होती. श्वासही घेता येत नव्हता. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिच्या पोटातील बाळ दगावण्याची शक्यता होती. ईएनटीतज्ज्ञ डॉ. मीनल गुप्ता यांनी आपल्या अनुभवातून व्हेंटिलेटरच्या दाबाकडे विशेष लक्ष दिले. तब्बल आठ दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. या दरम्यान तिला देण्यात येणाऱ्या औषधांमुळेही तिच्या गर्भाला धोका होता. परंतु मेडिकलच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. फिदवी, डॉ. अरुण हुमणे हेही तिची काळजी घेत होते. तब्बल २८ दिवसांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर मोनिका बोलायला लागली, नातेवाईकांना ओळखायला लागली. लवकरच तिला रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.
‘स्कल बोन’ठेवला मांडीत
न्यूरोसर्जन डॉ. पटनाईक म्हणाले, मेंदूत रक्तस्राव झाला होता. मेंदूला मोठी सूजही आली होती. यामुळे डाव्या भागातील ‘स्कल बोन’ काढून शस्त्रक्रिया करण्यात आली. हे ‘स्कल बोन’ सध्या मांडीत ठेवण्यात आले आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा हे बोन काढून बसविले जाईल. याला वैद्यकीय भाषेत ‘क्रॅनिओप्लास्टी’ म्हणतात.
मेडिकलमुळे लाखो रुपये वाचले
प्लास्टिकची फुले विकणारा मोनिकाचा पती निखिल म्हणाला, या महिन्याभराचा उपचारात केवळ २० हजार रुपये खर्च आला. आम्ही खासगी हॉस्पिटलमध्येच ठेवले असते तर शस्त्रक्रिया, अतिदक्षता व औषधोपचारात साधारण १० ते १२ लाख रुपये खर्च झाले असते. जे आमच्या ऐपतीच्या बाहेरचे होते. परंतु मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे दोघांचा जीवही वाचला व पैसेही.

Web Title: Trauma Care Center: Pregnant back from the door of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.