चोरीच्या वाहनांद्वारे ट्रॅव्हल्स एजन्सी : गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 09:06 PM2021-01-07T21:06:55+5:302021-01-07T21:10:14+5:30
Travel agency through stolen vehicles, crime newsमालकाची इनोव्हा व कार चोरी करून ट्रॅव्हल्स एजन्सी चालविणारा एक युवक गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालकाची इनोव्हा व कारचोरी करून ट्रॅव्हल्स एजन्सी चालविणारा एक युवक गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. महेंद्र गुलाबराव चाके (वय ३६, रा. राजापेठ, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.
महेंद्र हा साई मंदिराजवळील जीतू ट्रॅव्हल्सचे संचालक धर्मेंद्र रोहीकर यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली. यानंतर तो स्वत:ची ट्रॅव्हल्स एजन्सी चालवू लागला. कार्यालय उघडण्याऐवजी तो घरूनच काम करू लागला. स्वत:चे वाहन नसल्याने त्याचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. त्याने मार्च २०१९ मध्ये रोहीकर यांची कार चोरली. तिची नंबर प्लेट बदलवून लोकांना ती भाड्याने देऊ लागला. या चोरीच्या कारने महेंद्रचा व्यवसाय चालू लागला. यानंतर महेंद्र रोहीकरची इनोव्हा चोरण्याची तयारी करू लागला. महेंद्रचे रोहीकर यांच्या कार्यालयात येणे-जाणे होते. त्याने सप्टेंबर महिन्यात रोहीकर यांची नजर चुकवून इनोव्हाची चावी चोरली. यानंतर तो इनोव्हा चोरण्याची संधी शोधू लागला. अलीकडेच त्याने इनोव्हा गाडीही चोरली. रोहीकर यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत होती. त्यांना या चोरीमध्ये महेंद्रचा हात असल्याचे समजले. त्यांनी महेंद्रला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली.
ही कारवाई अप्पर आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय गजानन कल्याणकर, पीएसआय मयूर चौरसिया, नरेंद्र ठाकूर, प्रवीण रोडे, रवी अहिर, कुणाल मसराम, सुहास शिंगणेश, सूरज भोंगाडे, आशिष पाटील, नरेश देशमातुरे आणि सुधीर पवार यांनी केली.