coronavirus; ट्रॅव्हल एजंटांचे दरमहा १०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:59 AM2020-03-19T11:59:37+5:302020-03-19T12:00:58+5:30
कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकिटे विकली जात नाहीत शिवाय विमान, बस व रेल्वे तिकिटांचे कॅन्सलेशन चार्जेस कापून घेतले जात असल्याचे हे नुकसान होत आहे. विमान तिकिटांसाठी देशांतर्गत कॅन्सलेशन चार्ज २५०० ते ३००० आहे तर आंतरराष्ट्रीय तिकीटांसाठी ७००० ते ३०,००० आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
नागपूरात जवळपास ५०० ट्रॅव्हल एजंट्स काम करतात. त्यात बस, रेल्वे, विमानाची तिकिटे बुक करणे हॉटेल, वाहनांचे आरक्षण, यात्रा व देशी/विदेशी टूर आयोजित करणे, जंगल सफारी यांचा समावेश असतो. नागपुरातून दररोज ५००० प्रवासी विमानाने बाहेर जातात/येतात तर बस आणि रेल्वे प्रवाशांची संख्या जवळपास १.५० लाख आहे. सध्या विमान प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे, असे अनेक ट्रॅव्हल एजंटनी सांगितले.
मध्य भारतातील सर्वात मोठी ट्रॅव्हल एजन्सी पवनसुत ट्रॅव्हल्स प्रा. लि. मधून रोज १४० ते १५० देशांतर्गत तिकिटे तर १५ ते २० आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक होतात. सध्या फक्त ३० ते ३५ देशांतर्गत तिकिटे बुक होतात व एकही आंतरराष्ट्रीय तिकीट विकले जात नाही, असे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जॅगसन्स ट्रॅव्हल्सचे प्रबंध संचालक हरमनदीपसिंग आनंद म्हणाले, व्यवसाय मंदावल्यामुळे आम्ही ४० पैकी ३५ कर्मचाऱ्यांना घरात बसून काम करायला सांगितले आहे.
निखार ट्रॅव्हल्सचे सुधीर पारख म्हणाले की केरळ, गोवा, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश यांनी देशांतर्गत प्रवाशांना प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवसाय ४० ते ५० टक्के घटला आहे. आंतरराष्ट्रीय बुकिंग ८० ते ९० टक्क्यांनी घटले आहे.
डेस्टिनेशन ट्रॅव्हल्स व व्हॅकेशन प्लॅनर्सचे राज अकोलकर व अंकुश ट्रॅव्हल्सचे अंकुश देशमुख यांनी विमान तिकिटे रद्द झाली तर हॉटेल व वाहनांचे बुकिंगही रद्द करावे लागते, त्यामुळे तिहेरी नुकसान होते असे सांगितले.
अद्वैत ट्रॅव्हल्सचे विजय कृपाल यांनी कोरोनाच्या भीतीने बस व रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत त्यामुळे व्यवसाय ५० टक्के घटला आहे, असे सांगितले.
एप्रिल व मे हे दोन महिने देशांतर्गत व विदेशी टूरसाठी महत्त्वाचे असतात; पण यावर्षी दोन्ही महिन्यातील टूर रद्द झाले आहेत, हे मोठे नुकसान आहे. व्यवसाय किमान दोन ते तीन महिने पूर्वपदावर येणार नाही, असे सर्वच ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले.