ट्रॅव्हल्स-ऑल्टो कारचा भीषण अपघात, २ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 07:55 PM2019-04-02T19:55:56+5:302019-04-02T20:04:59+5:30
सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्स मालक ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडला होता तर उपसचिवाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. ट्रॅव्हल्समधील इतर प्रवासी मात्र सुखरूप आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (भिवापूर ): सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्स मालक ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडला होता तर उपसचिवाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. ट्रॅव्हल्समधील इतर प्रवासी मात्र सुखरूप आहेत.
मृतांमध्ये अशोक तानबाजी उईके (५८) रा. सानपाडा, मुंबई (मूळ गाव वर्धा) व ट्रॅव्हल्स मालक पंकज लक्ष्मण खापर्डे (३५) रा. ब्रम्हपुरी यांचा समावेश आहे. मृत अशोक उईके हे मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव म्हणून काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३४ बीजी ४२५२ ही भरधाव वेगात गडचिरोलीकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, चालकाचे नियंत्रण बिघडल्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या आॅल्टो कार क्रमांक एमएच ४९ बीबी ०६६७ ला जबर धडक दिली. यात ऑल्टो कारच्या दर्शनीभागाचा चुराडा झाला. यात कार चालक अशोक उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्सने रस्ता सोडून कडेला असलेल्या विद्युत खांबांना धडक दिली. दरम्यान, ट्रॅव्हल्सच्या दारात उभा असलेला ट्रॅव्हल्सचा मालक पंकज खापर्डे बाहेर फेकल्या गेला. अशात ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध भादंविच्या २७९,३०४, आरडब्ल्यू १८४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.