नागपुरात मेट्रो रेल्वेच्या प्रवासाने मुले, वयस्क आनंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:21 AM2018-04-22T00:21:08+5:302018-04-22T00:21:26+5:30
नागपूरकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आज अवतरला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एटग्रेट सेक्शनमध्ये साऊथ एअरपोर्ट ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत शनिवारी नागपुरातील मूकबधिर विद्यालयातील मुले, वृद्धाश्रमातील वयस्क आणि गरजू मुलांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आज अवतरला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एटग्रेट सेक्शनमध्ये साऊथ एअरपोर्ट ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत शनिवारी नागपुरातील मूकबधिर विद्यालयातील मुले, वृद्धाश्रमातील वयस्क आणि गरजू मुलांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. या प्री-जॉय राईडमुळे मुले आणि वयस्कांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मेट्रोच्या पहिल्या प्री-जॉय राईडमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी आणि प्रणाली घोगरे सहभागी झाले.
याप्रसंगी महामेट्रोच्यावतीने मुले, वयस्क आणि कलाकारांचे प्रकल्प संचालक महेश कुमार, वित्त संचालक एस. शिवामाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळबे, आशीष भोयर, रश्मी मदनकर व अन्य कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. मेट्रोच्या प्रवासाप्रति नागपूरकरांमध्ये जनजागृती आणण्यासाठी आणि मेट्रोचे महत्त्व सांगण्याकरिता पहिल्या प्री-जॉय राईडचे आयोजन करण्यात आले. कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीतर्फे हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मेट्रोचे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रोमध्ये सर्वप्रथम मुले, वयस्कांना प्रवास घडविण्याचा निर्णय घेतला होता.
रामभाऊ यांचे विमलाश्रम, मातृसेवा संघाचे वृद्धाश्रम, मूकबधिर विद्यालय, युवा चेतना मंच आणि दत्तात्रयनगर येथील संस्था सहभागी झाली. या सर्व संस्थांचे १०० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि वयस्क नागरिकांनी राईडचा आनंद घेतला. या दरम्यान अभिनेत्यांनी वेगाने होणाऱ्या मेट्रोच्या कामांची प्रशंसा केली. लहान मुले आणि वयस्कांनी महामेट्रोने दिलेल्या निमंत्रणासाठी अधिकाऱ्यांचे आभार मानले. मेट्रो रेल्वेने प्रवास करू, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण महामेट्रोने संधी दिल्याने आम्हाला फार आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कलाकार म्हणाले आनंद आला
अभिनेते सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी आणि प्रणाली घोगरे यांनी फार कमी वेळेत मेट्रो रुळावर धावण्यासाठी महामेट्रोची प्रशंसा केली. सचिन पिळगावकर म्हणाले, यापूर्वी कोणत्याही मेट्रोने प्रवास केलेला नाही. येथे गुणवत्तेचे बांधकाम झाले आहे. गुणवत्तेच्या सक्षम एसीमुळे बाहेरील उन्हाचा त्रास जाणवला नाही. स्वप्निल जोशी यांनी कमी वेळेत मेट्रो रुळावर धावण्याची प्रशंसा केली. अभिनेत्री प्रणाली घोगरे यांनी मेट्रोच्या कामाची प्रशंसा करताना भविष्यात गुणवत्तेच्या कामासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.