नागपुरात ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:27 PM2019-05-30T23:27:28+5:302019-05-30T23:29:00+5:30
उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
नागपुरातून काही शहरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यात नागपूर-पुणे एसी स्लिपरसाठी १४५०- १७०० रुपये, नॉन एसीसाठी एक हजार ते ११०० रुपये दर आहेत. नाशिकसाठी एसी स्लिपर १ हजार ते १३२७ रुपये आकारण्यात येत आहेत. हैदराबादसाठी १३०० ते १५३० रुपये, तर औरंगाबादसाठी एसी स्लिपर ८५० ते ९०० रुपये आणि नॉन एसीसाठी ७५० रुपये आकारण्यात येत आहेत. यात काही सिट बुक झाल्यानंतर अचानक तिकिटाची रक्कम आणखी जास्तच वाढविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु नाईलाजास्तव प्रवासी अधिकचे पैसे देऊन प्रवास करीत असल्याची स्थिती आहे. गर्दीच्या दिवशी हे दर १२ टक्के अधिक आकारण्यात येत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सने वाढविलेल्या दराबाबत विचारणा केली असता डिझेलचे वाढलेले दर आणि टोल टॅक्स यामुळे दर वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजून १५ दिवस हे दर असेच कायम राहणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.
डिझेलचे भाव वाढल्यामुळे दरवाढ
‘डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बऱ्याच ठिकाणी टोल टॅक्स वाढला आहे. वाढलेल्या खर्चामुळे ट्रॅव्हल्सचे दर वाढविण्याचा निर्णय ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे.’
महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन नागपूर