जनरलच्या तिकीटावर ‘स्लिपर क्लास’ने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:06 AM2018-09-11T01:06:16+5:302018-09-11T01:07:14+5:30
रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी २० लाख प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी २० लाख प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला.
रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी अनेक प्रवासी आधीच प्रवासाचा बेत आखून तीन महिन्यापूर्वी आरक्षणाचे तिकीट खरेदी करतात. परंतु काही प्रवाशांना ऐनवेळी प्रवास करण्याची वेळ येते. अशावेळी ते जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात. जनरल कोचमध्ये असलेली खचाखच गर्दी पाहून ते स्लिपरक्लासमध्ये चढतात. रेल्वेतर्फे वेळोवेळी तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येते. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राबविलेल्या अभियानात अशा अनियमित तिकीटधारक आणि पार्सलची नोंद न करणाऱ्या १.२० कोटी प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला. फक्त आॅगस्ट महिन्यात सामानाची नोंद न करता प्रवास करणाºया ४९८८ प्रवाशांकडून ४.३१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने माल वाहतुकीद्वारे १ कोटी १६ लाख रुपये उत्पन्न मिळविले. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र आणि वाणिज्य विभागाच्या कर्मचाºयांनी पार पाडली. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य दराचे तिकीट घेऊन संबंधित कोचमधून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मासिक तिकीटधारकही आरक्षित डब्यात
मासिक तिकीटधारक अनेकदा स्लिपरक्लास, एसी कोचमध्ये प्रवास करतात. अशा वेळी संबंधित कोचमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. रेल्वेतर्फे अनेकदा अशा मासिक तिकीटधारक प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे मासिक तिकीटधारकांनी केवळ जनरल कोचने प्रवास करण्याची गरज आहे.