एसटीच्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:38 AM2018-06-07T01:38:29+5:302018-06-07T01:38:49+5:30
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे.
एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित असल्यामुळे प्रवासी एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. अलिकडच्या काळात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविल्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्याही वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १५ जूनपासून एसटीच्या भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी महामंडळात सहा किलोमीटरचा एक टप्पा असा हिशेब करण्यात येतो. त्यानुसार सध्या एसटी महामंडळाकडून प्रति सहा किलोमिटरसाठी ६ .३० रुपये आकारण्यात येतात. १८ टक्के दरवाढीच्या निर्णयानंतर प्रति ६ किलोमिटरसाठी ७.४५ रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासभाड्यापोटी अधिक रक्कम मोजण्याची पाळी येणार आहे. नागपुरातून काही प्रमुख शहरात जाणाऱ्या एसटीच्या बसेसचे प्रवासभाडे पुढील प्रमाणे राहील.
नागपुरातून काही प्रमुख शहरांचे भाडे
सध्याचे भाडे दरवाढीनंतरचे भाडे
चंद्रपूर १६५ १९५
यवतमाळ १५९ १९०
वर्धा ८९ १०५
अकोला २७८ ३३०
अमरावती १६५ १९५
भंडारा ७० ८५
उमरेड ५१ ६०
काटोल ६४ ७५
रामटेक ५८ ७०
सावनेर ४५ ५५