कोरोनाचा धोका वाढविणारी ट्रॅव्हल्स बस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:04+5:302021-03-17T04:10:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवाशांनी खच्चून भरलेली बस मध्य प्रदेशकडे निघण्याच्या तयारीत असताना परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता ...

Travels bus seize the risk of corona | कोरोनाचा धोका वाढविणारी ट्रॅव्हल्स बस जप्त

कोरोनाचा धोका वाढविणारी ट्रॅव्हल्स बस जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रवाशांनी खच्चून भरलेली बस मध्य प्रदेशकडे निघण्याच्या तयारीत असताना परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू तेथे धडकल्या आणि त्यांनी ती बसच ताब्यात घेतली. त्यानंतर ट्रॅव्हल्सचे संचालक आणि चालक, वाहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मंगळवारी रात्री पोलीस उपायुक्त साहू धंतोलीच्या यशवंत स्टेडिअम परिसरात सरप्राइज चेकिंग करीत असताना त्यांना अमरदीप ट्रॅव्हल्सची प्रवाशांनी खच्चून भरलेली बस दिसली. त्यांनी लगेच त्या बसजवळ जाऊन चालकाला खाली उतरवले. आतमध्ये पाहणी केली असता प्रवासी खच्चून भरले होते.

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने आस्थापना तसेच प्रवासासंदर्भात काही अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार, या बसला ३० प्रवाशांच्या नेण्या-आणण्याची परवानगी असताना त्यात ५६ प्रवासी आढळले. सुरक्षित अंतराबाबत वारंवार सांगितले जात असताना बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र होते. ते पाहून उपायुक्त साहू यांनी धंतोली पोलिसांना घटनास्थळी कारवाईसाठी बोलावून घेतले. बसचे चालक, वाहक तसेच ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

---

प्रवाशांची व्यवस्थाही केली

माहितीनुसार, ही बस मध्य प्रदेशच्या शिवनी, सागरकडे निघाली होती. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ऐनवेळी आता कशाने गावाला जायचे, दुसऱ्या बसच्या भाड्याचे पैसे कसे जमवायचे, अशी कुजबुज प्रवाशांत सुरू झाली. बसमध्ये बहुतांश मजूर होते. त्यांनी उपायुक्त साहू यांना आपली अडचण सांगितली. ती ऐकून साहू यांनी लगेच या सर्व प्रवाशांना तातडीने त्यांच्या गावाला पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दोन बसमध्ये कोविडच्या अटीचे पालन करून प्रवाशांना नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.

Web Title: Travels bus seize the risk of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.