कोषागारचे अकाऊंट सेक्शन खाक
By Admin | Published: May 13, 2017 02:36 AM2017-05-13T02:36:37+5:302017-05-13T02:36:37+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.
महत्त्वपूर्ण दस्तऐवजासह सर्व्हर रूमही जळाली : कोट्यवधींचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. यामुळे परिसरातील लोक हादरून गेले होते. या आगीत अकाऊंट सेक्शन पूर्णपणे खाक झाला. यात महत्त्वपूर्ण दस्तऐवजासह फर्निचर, कॉम्प्युटरसह कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. याच विभागातील सर्व्हर रूमही पूर्णत: जळाली.
शुक्रवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास कोषागार कार्यालयातील पहिल्या माळ्यावर असलेल्या अकाऊंट सेक्शनमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक याच विभागातील सर्व्हर रूममध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे आढळून आले. आगीचा भडका उडताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत कार्यालय रिकामे केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत संपूर्ण अकाऊंट सेक्शन आगीत खाक झाले होते.
या आगीत अकाऊं ट सेक्शनमधील सर्व्हर रूम पूर्णत: जळाली. यातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले. टेबल खुर्च्याही जळाल्या. टेबलावरील दस्तऐवज जळाले. यात विविध विभागातील महत्त्वाचे बिल असतात. ते सर्व जळालेत. विभागातील संपूर्ण विजेची लाईन जळून खाक झाली. कॉम्प्युटर, मॉनिटर, की, बोर्ड, केबल लाईन संपूर्ण जळाले.
जेवणही करता आले नाही
कोषागार कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी जेवण करायचे होते. या आगीत अनेकांचे जेवणाचे डबेही जळून खाक झाले.
एक कर्मचारी किरकोळ भाजला
आग लागली तेव्हा प्रचंड धूर निघत होता. काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. यातच धूर बाहेर निघावा म्हणून एका कर्मचाऱ्याने खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. यात तो किरकोळ भाजला गेला.
आग लागली की लावली ?
कोषागाराला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी या आगीबाबत परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. कोषागारात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र असतात. त्यामुळे ही आग कुणी लावली की लावण्यात आली, अशी चर्चाही परिसरात होती.