१८ जखमी सैनिकांवर नागपुरात उपचार
By admin | Published: May 5, 2017 02:49 AM2017-05-05T02:49:41+5:302017-05-05T02:49:41+5:30
गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या १८ सैनिकांना गुरुवारी नागपुरातील...
दोघांची प्रकृती गंभीर : चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया
नागपूर : गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या १८ सैनिकांना गुरुवारी नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. यातील चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्री उशिरा राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या रुग्णालयाला भेट देत सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
‘सी-६०’ कमांडोंचे पथक गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. ही गाडी २० ते २५ फूट उंच उडून सैनिकांच्या अंगावर पडल्याने ३९ सैनिक जखमी झाले. यातील नामदेव भोगामे (२५), अतुल पवार (२५), प्रकाश कन्नाके (३०), हिदायत खान (२५) व दीपक भांडवलकर या पाच गंभीर सैनिकांना सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपुरात आणून ‘क्युअर इट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दीपक भांडवलकर या सैनिकाचे मूत्राशय फाटले असून, शरीरावर गंभीर जखमा आहेत. त्याला आॅक्सिजनवर ठेवण्यात आल्याचे इस्पितळाच्यावतीने सांगण्यात आले. उर्वरित १३ जखमी सैनिकांना टप्प्याटप्प्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रुग्णालयात आणण्यात आले. यातील सर्व सैनिकांची प्रकृती स्थिर आहे. येथील डॉक्टरांनी सांगितले, स्फोट इतका भीषण होता की सैनिकांचे वाहन २० ते २५ फूट उंच उडून अंगावर पडले. यामुळे बहुतांश सैनिकांमध्ये हातापायाच्या फ्रॅक्चरसोबतच इतरही ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत.
सूत्रानुसार, डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या चमूने सैनिक दाखल करण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध करून दिला. यातील नऊ रक्तपिशव्या लागल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
भ्याड हल्ल्याचे उत्तर दिले जाईल
जखमी सैनिकांची पाहणी केल्यानंतर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, या भ्याड हल्ल्याचा पोलीस आपल्या पद्धतीने उत्तर देतील. गस्त घालणाऱ्या सैनिकांची सुरक्षा प्रणालीही तपासून घेतली जाईल. जखमी सैनिकांची प्रकृती स्थिर असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते.