मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:50+5:302021-05-26T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभवण्याचा इशारा देण्यात येत आहे. अशा स्थितीत मुलांमध्ये कोरोनाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभवण्याचा इशारा देण्यात येत आहे. अशा स्थितीत मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करण्यात यावेत, तसेच बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालचिकित्सा विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. जैन बोलत होत्या.
ग्रामीण, तसेच शहरी भागातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. कोरोना झालेल्या बाळांमध्ये थोडी वेगळी लक्षणे आढळतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील वातावरण, राहणीमानही थोडे वेगळे असते. त्यामुळे अशा भागांत राहणाऱ्या बाळांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, पोट दुखणे, जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात, अशी माहिती डॉ. जैन यांनी दिली.
अशी घ्यावी बाळांची काळजी
-भरपूर पाणी पाजा.
-बालकांना पातळ आहार द्यावा.
- ताप, ऑक्सिजन पातळी मोजत राहा.
-१०० फॅरनहिट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामॉल द्या.
-ताप असल्यास दर सहा तासांनी पॅरासिटामॉल देता येईल.
-कोरोनासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका.
-चार दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर बाळाला दवाखान्यात न्यावे.
-बाळाला श्वसनास त्रास होत असेल तरी दवाखान्यात न्यावे.
-भूक कमी होणे, बाळ सुस्त असल्यासही तातडीने सल्ला घ्यावा.