जमिनीवर झोपवून बालकांवर उपचार
By admin | Published: September 9, 2016 03:02 AM2016-09-09T03:02:57+5:302016-09-09T03:02:57+5:30
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने शून्य ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते.
मेयो प्रशासनाची उदासीनता : बालरोग विभागातील धक्कादायक प्रकार
सुमेध वाघमारे नागपूर
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने शून्य ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागाच्या वॉर्डात विचित्र स्थिती आहे. येथे एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवले जाते, एवढेच नव्हे तर या खाटाही कमी पडत असल्याने जमिनीवर गादी टाकून उपचार केला जात आहे.
प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. काही खासगी इस्पितळातील लूट आणि ग्रामीण रुग्णालयांत सोर्इंचा अभाव यामुळे मेयो रुग्णालय हे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी एकमेव आशेचे किरण आहे. या रुग्णालयात विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथून रुग्ण येतात. परंतु सोर्इंच्या अभावाने रुग्ण हातून जाण्याची भीती सतत नातेवाईकांना सतावत असते.
२५० खाटांच्या इमारतीतून वगळले
नागपूर : कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होत असलेल्या २५० खाटांच्या इमारतीत बालरोग विभागाला स्थान देण्यात आलेले नाही. केवळ शस्त्रक्रियेशी संबंधित विभागाला या इमारतीत जागा देण्यात आली आहे. यामुळे जेव्हा शल्यक्रिया विभागाचा वॉर्ड रिकामा होईल तेव्हा तो वॉर्ड बालरोग विभागाला मिळणार आहे. तोपर्यंत रुग्णांची परवड सुरूच राहणार आहे.
बालरोग विभागावर अनेकांचा विश्वास
मेयोच्या बालरोग विभागावर रुग्णांच्या नातेवाईकांचा विश्वास असल्याने येथे नेहमीच रुग्णांची गर्दी दिसून येते. येथील एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, येथे सोयी नसल्यातरी डॉक्टर रुग्णांवर चांगले उपचार करतात. प्रत्येक रुग्णाची काळजी घेतात, त्याना बरे करण्याचा जीवापाड प्रयत्न करतात.