कमी प्लेटलेट्सवर औषधोपचार शक्य : रिया बल्लीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:52 PM2019-09-23T19:52:06+5:302019-09-23T19:53:48+5:30
डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यांनी दिला. अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसच्या नागपूर शाखेतर्फे ‘हेमॅटो-ऑन्को सिम्पोसियम’चे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ‘आयटीपी-व्हॉट्स न्यू’ या विषयावर त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या की, प्लेटलेटस्ची रक्तातील संख्या घट होण्यासाठी डेंग्यू-मलेरियासारखे आजार, रक्ताचा कर्करोग, आयटीपी, अप्लास्टिक अॅनेमिया आदी रोग कारणीभूत आहेत. अनेकदा रुग्णांना प्लेटलेट्स चढविण्याची गरज असते. प्लेटलेट्सअभावी रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी प्लेटलेट्स डोनेशन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. विनय बोहरा यांनी ‘लिम्फोमा’ या आजारावरील उपचाराबद्दल बोलताना त्यांनी यासाठी ‘इम्युनोथेरपी’ प्रभावी असल्याचे सांगितले. यातील औषधे केवळ कॅन्सरच्या पेशीला नष्ट करतात. अन्य पेशींना त्यामुळे इजा पोहचत नसल्याने औषधांचा प्रभाव चांगला होत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. गिरीश बदरखे यांनी ‘एचएलएच’ या लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या रक्तसंसर्गित दुर्धर आजाराची माहिती दिली. या रोगावर उपचार करण्यासाठी किमोथेरपी प्रभावी ठरत असली तरी बोन मॅरो ट्रान्सप्लांटने या रोगाला रोखण्यात यश मिळू शकते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या परिषदेमध्ये रक्ताचे विविध विकार, रक्त कर्करोग, प्लेटलेटस आणि अन्य रक्त घटकांचा अभ्यास आणि नवीन औषधोपचार पद्धती या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ. दीपंजन हलदार, डॉ. फराह जिजिना, डॉ. रिया बल्लीकर, डॉ. समीर मेलिनकेरी, डॉ. विनय बोहरा, डॉ. गिरीश बदर्खे, डॉ. अविनाश पोफळी, डॉ. गोहोकर, डॉ. ए.के. गंजू यांनीही मार्गदर्शनपर सत्र आयोजित केली होती.
प्रास्ताविक अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल यांनी केले. आभार डॉ. संजय जैन यांनी व्यक्त केले. डॉ. रिया बल्लीकर या सिम्फोसियमच्या समन्वयिका होत्या.