२६२ वर्षांच्या पिंपळ वृक्षाच्या पूजनाने वृक्षगणनेला केली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2023 21:33 IST2023-04-24T21:32:58+5:302023-04-24T21:33:25+5:30
Nagpur News महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा क्षेत्रातील विविध वृक्षांच्या गणनेला सोमवारपासून सुरुवात करण्यात येत आहे.

२६२ वर्षांच्या पिंपळ वृक्षाच्या पूजनाने वृक्षगणनेला केली सुरुवात
नागपूर : महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा क्षेत्रातील विविध वृक्षांच्या गणनेला सोमवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शहरातील २६२ वर्षे जुन्या पिंपळाच्या वृक्षाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूजन करून केली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उपअभियंता सुनील गजभिये, पंडित उकेबांते, संजय गुजर, अशोक जैन यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
- २०११ मध्ये २१,४३,८३८ वृक्ष
मनपातर्फे २०११ साली वृक्षगणना करण्यात आली होती. तेव्हा शहरातील वृक्षाची संख्या २१,४३,८३८ होती. सद्य:स्थितीत नागपूरची वृक्षसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. नागपूर शहर २२२ स्के.किमी भागात विस्तारित असून, नागपूर शहराच्या नवीन प्रभाग रचनेनुसार व त्यात समाविष्ट करण्यात आलेली गावे हुडकेश्वर व नरसाळा इत्यादींचा समावेश करून, नव्याने वृक्षगणना करण्यात येणार आहे.
- वृक्षगणनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
वृक्षगणनेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जीआयएस व जीपीएस पद्धतीने वृक्षगणना करण्यात येणार आहे. याशिवाय हेरिटेज वृक्षांची माहिती व संख्या, अंदाजे वय, छायाचित्र आदी बाबी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह पर्यावरण अभ्यास, विद्यार्थी, व्यावसायिक आदींना होणार आहे. या कामासाठी जवळपास ११ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वृक्षगणना करण्यासाठी टेराकॉन इकोटेक प्रा. लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्षाची मराठी, इंग्रजी आणि बॉटॅनिकल नावासह एकूण ३४ प्रकारची विविध माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वृक्षाला स्वतंत्ररीत्या युनिक आयडी राहणार आहे.