विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू
By कमलेश वानखेडे | Published: April 5, 2024 04:12 PM2024-04-05T16:12:38+5:302024-04-05T16:14:42+5:30
भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
नागपूर : विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल आहे. विद्यमान सरकारविरोधात राग असून, काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती आहे. भाजपचे तानाशाही पद्धतीने काम सुरू आहे. यामुळे लोकांमध्ये भीती आहे. भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपचे निगेटिव्ह वातावरण असल्यामुळे गडचिरोलीचा भाजप उमेदवार पडणार आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. चंद्रपूरला ९ व १० तारखेला प्रचारासाठी मी जाणार असून, धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा - गोंदिया येथेही काँग्रेस पूर्ण ताकदीने काम करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही सभा होणार असून, त्यासाठी तयारी सुरू आहे. या सभेचा पूर्व विदर्भातील पाचही जागांवर फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला. सांगलीची जागा काँग्रेसची होती. या सगळ्या वादात ताणून घ्यायचे नाही. याबाबत हायकमांड निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सात खासदारांची गती ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे. शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, असा दावाही त्यांनी केला.