‘माझी मेट्रो’ची ‘ट्रायल रन’ दसºयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:28 AM2017-09-27T01:28:17+5:302017-09-27T01:28:29+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते एअरपोर्ट साऊथ स्टेशनदरम्यान ५.०४ कि़मी. मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ ३० सप्टेंबर अर्थात दसºयाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते एअरपोर्ट साऊथ स्टेशनदरम्यान ५.०४ कि़मी. मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ ३० सप्टेंबर अर्थात दसºयाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ‘माझी मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील, अशी घोषणा महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मंगळवारी केली. यामुळे नागपूरच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ‘ट्रायल रन’च्या दिशेने २४ तास काम सुरू आहे. ‘ओएचई’चे (ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन) काम पूर्ण झाले आहे. हैदराबाद येथून आणलेल्या ‘बुलंद’ नावाच्या इंजिनच्या माध्यमातून रुळाची यशस्वी तपासणी करण्यात आली. याशिवाय हैदराबाद येथून लीजवर मागविण्यात आलेले मेट्रो रेल्वेचे तीन कोच बुलंदच्या माध्यमातून रुळावर चालविण्यात आले. याशिवाय विविध प्रकारच्या प्रायोगिक चाचण्या (तांत्रिक) घेण्यात आल्या. विविध तपासण्यांनंतर आरडीएसओने (लखनौ) ट्रायल रनसंदर्भात सर्व पैलूंचा अभ्यास करून कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र आणि पुढील प्रक्रियेसाठी अनुकूल अहवाल दिला. दोन वर्षांत मेट्रो रेल्वेची ट्रायल रन घेण्याचे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने प्रारंभी दिलेले आश्वासन यानिमित्ताने प्रत्यक्षात येणार आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर सोपविली आहे. त्यातील पहिला टप्पा केवळ सव्वादोन वर्षांत दसºयाला पूर्ण होणार आहे.
दसºयाला माझी मेट्रोचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने आणि जनतेच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात येणार आहे. यावेळी जनतेला माझी मेट्रोचे अवलोकन प्रत्यक्षपणे करता येईल. जनतेच्या सुविधेसाठी या कार्यक्रमाचे प्रसारण विविध माध्यमातून करण्यात येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी ‘महाकार्ड’चे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते होणार आहे. दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील मुलांना प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना माझी मेट्रोच्या ट्रायल रनचा आनंद जवळून अनुभवता येईल. महाकार्डमुळे नागरिकांना घर ते मेट्रो स्टेशन आणि तेथून फिडर सर्व्हिस व अन्य साधनांद्वारे निर्धारित ठिकाणी सुलभरीत्या पोहोचता येईल. टॅक्सी फेअर, पार्किंग शुल्क, मेट्रो तिकिटांची खरेदी, मॉल, रेस्टॉरंटमध्ये या कार्डाचे चलन राहील. जीवन सुरक्षा, आर्थिक बचत आणि सन्मानजनक प्रवासासाठी माझी मेट्रो फायद्याची ठरणार आहे.