ट्रायथलॉन शर्यत; सुनीता धोटे ‘लेडी आयर्नमॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:39 AM2020-02-29T10:39:37+5:302020-02-29T10:40:05+5:30
वयाच्या ४७ व्या वर्षी डॉ. सुनीता धोटे यांनी मध्य भारतातील पहिल्या लेडी आयर्नमॅन (७०.३) बनण्याचा मान मिळविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाच्या ४७ व्या वर्षी डॉ. सुनीता धोटे यांनी मध्य भारतातील पहिल्या लेडी आयर्नमॅन (७०.३) बनण्याचा मान मिळविला आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या आव्हानात्मक ट्रायथलॉन शर्यतीत त्यांनी १.०९ किमी जलतरण, ९० किमी सायकलिंंग आणि २१ किमी धावण्याच्या शर्यतीचा टप्पा ७ तास ४० मिनिटात सर केला. तिन्ही शर्यतीत त्यांना एकूण ११३ किमी अंतर पूर्ण करावे लागले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ८ तास ३० मिनिटांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. स्वत:चा अनुभव सांगताना रामदेवबाबा कमला नेहरूअभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या धोटे म्हणाल्या, ‘हा अनुभव माझ्यासाठी खरोखर आव्हानात्मक होता. काही दिवसांआधी सायकलिंग करताना मला अपघात झाला होता. तरीही सैनिकाची मुलगी असल्याने हार मानण्याचा माझा स्वभाव नाही. जिद्दीने ही शर्यत पूर्ण केली. वाढत्या वयातही आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित एक तास व्यायामकरा,ही भावना रुजविण्याच्या हेतूने माझा हा प्रयत्न आहे. ’धोटे यांनी याआधी २०१४ ला माँट्रियल येथे १५ व्या फिना विश्व जलतरण स्पर्धेत मास्टर्स गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी नागपूर ते पुड्डूचेरी असा सायकल प्रवास केला. त्यासाठी त्यांच्या नावाची आशिया बुक रेकॉर्डमध्येदेखील नोंद झाली आहे. दररोज तीन तास आणि रविवारी पाच तास असा त्यांचा सराव चालतो. अंबाझरी तलावात त्यांचा पोहण्याचा सराव चालतो. दुबईत १०७ देशांतील २५०० स्पर्धकांमधून त्यांनी स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविला. या स्पर्धेत शंभर महिला स्पर्धक होत्या, त्यातही भारतातून केवळ चार महिला स्पर्धकांनी हजेरी लावली होती, असे धोटे यांनी सांगितले. यावेळी गणेश क्षीरसागर आणि डॉ. राजेंद्र जैस्वाल उपस्थित होते.
‘हा अनुभव माझ्यासाठी आव्हानात्मक होता. त्यादृष्टीने योजनेंतर्गत सराव केला. अंबाझरी तलावात पोहल्यानंतर सायकलिंग आणि धावण्यासाठी मैदानांसह रस्त्यांचा उपयोग केला. दुबईबाहेरील रस्त्यांवर वालुकामय भागात रेस पूर्ण करताना अतिउत्साह टाळला. नियंत्रितपणे सहभाग आणि नागपूरकरांच्या आशीर्वादामुळे मला फार कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्यात यश आले.’
- डॉ. सुनीता धोटे