आदिवासी मुलींनी राजकारणात यावे- निर्मला पुतुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:06 AM2019-03-09T10:06:43+5:302019-03-09T10:08:13+5:30
आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे. आदिवासी स्त्री स्वत:चे निर्णय स्वत: घेत असते. मात्र याचा अर्थ ती कामूक दृष्टीनेही स्वतंत्र असते, असा एक गैरसमज समाजात दृढ झालेला दिसतो. तो वृथा आहे. मात्र बरेचजण तसा अर्थ काढत असतात. आदिवासी स्त्री घरासाठी कष्ट करते, खरेदी करते. मात्र तिला संपत्तीत वाटा नसतो. तिला तिच्याच समाजात अधिकार नाहीत. ते तिला मिळायला हवेत. तिला आर्थिक स्वावलंबनापासून वंचित ठेवले जाते.
नागपुरात आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांचे आगमन झाले आहे.
जोपर्यंत स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत तिला स्वालंबनाची चव चाखता येणार नाही. हे स्वावलंबन शिक्षणाने येऊ शकते. आज आदिवासी पाड्यांवरच्या मुली मुलांच्या तुलनेत अधिक संख्येने शिक्षण घेत आहेत. त्या मेहनत करत आहेत. त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी मला आशा वाटते. त्या दृष्टीने गावची मुखिया या नात्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.
कविता महाजन यांचे हृद्य स्मरण
निर्मला पुतुल यांचा ‘ नगाडे की तरह बजते शब्द’ या काव्यसंग्रहाचे इंग्रजी, मराठी, उर्दू, उडिया, कन्नड, पंजाबी, नेपाळी भाषेत भाषांतर झाले आहे. मराठीत हा अनुवाद दिवंगत ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांनी केला होता. कविता महाजन यांचे स्मरण करताना, निर्मला पुतुल यांनी, आमची भेट भोपाळमध्ये झाली होती. अचानक जुनी मैत्रीण भेटावी तशी ती भेट होती. त्या अतिशय सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने जी क्षती झाली आहे ती कदाचितच भरून निघू शकेल, असे उद्गार काढले.
निर्मला पुतुल आहेत गावच्या ‘मुखिया’
निर्मला पुतुल त्यांच्या गावच्या मुखिया म्हणून निवडून आल्या आहेत. गावातील मुलींच्या विकासात शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमगत असल्याने त्यांनी त्यादृष्टीने गावात शिक्षणाची सोय केली आहे. त्या गावातील सर्व मुली शिक्षण घेत आहेत असं त्या साभिमान सांगतात.