आदिवासी हे हिंदूच
By admin | Published: October 4, 2015 03:14 AM2015-10-04T03:14:35+5:302015-10-04T03:14:35+5:30
वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत.
आदिवासी मंत्री विष्णू सावरा : अ. भा. वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलन
नागपूर : वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत. त्यामुळे आदिवासींना हिंदूंपासून वेगळे करण्याचे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे केले.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्ता संमेलनातील एका सत्रात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल आणि आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराव व्यासपीठावर होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, आदिवासींसाठी वनवासी कल्याण आश्रमाद्वारे सुरूअसलेले काम अतिशय योग्य आहे.
आदिवासींचे अधिकार हिरावून घेण्यासाठी काही लोकं स्वत:ला आदिवासी म्हणवून घेत आहेत. आदिवासींमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण शासनस्तरावर लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अ.भा. वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रकाशित वनबंधू या मासिक पत्रिकेच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाख
शासनातर्फेसुद्धा आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे काम केले जात आहे. राज्य सरकार राज्यातील ग्रामपंचायतींना यंदा २५८ कोटी रुपये देणार आहे. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट १० लाख रुपये मिळतील. यासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यंदा २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकात्म दर्शन हा भारताचा आत्मा
ईश्वर हा प्रत्येक सजीवात वास करतो. तो मनुष्य, पशु, पक्षी इतकेच नव्हे तर वृक्षांमध्येसुद्धा आहे, अशी आपली भारतीय विचारधारा आहेत. त्यामुळे आपण सर्व मनुष्याप्रति, पशुपक्ष्यांप्रति इतकेच नव्हे तर वृक्षांप्रति सुद्धा आदरभाव ठेवतो. हा प्रकार केवळ भारतात दिसून येतो. तो दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येत नाही. हाच एकात्म भाव आहे. तो भारताचा आत्मा आहे. रोजच्या व्यवहारात आपण तो जगतो. भारताची ही अमूल्य देण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.