नागपुरात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:52 PM2019-09-10T20:52:04+5:302019-09-10T20:55:50+5:30
कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना आजाराची लागण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी गृहपालाकडे आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास सांगितले पण गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांची ओरड आहे की, गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करण्यात आली नाही. त्यामुळे साथ रोग पसरल्यासारखी अवस्था वसतिगृहाची झाली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या संडासचा त्रास होत आहे. वसतिगृहात जवळपास १०५ विद्यार्थी प्रवेशित आहे. पण वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधेचा अभाव आहे. मंगळवारी विद्यार्थ्यांनी गृहपालांना आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले तेव्हा त्यांच्याकडून गैरजबाबदारीचे उत्तर मिळाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी आरोग्याची समस्या दूर होईपर्यंत वसतिगृहाच्या परिसरात ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर प्रकल्प कार्यालयातून शिक्षण विस्तार अधिकारी, हाऊस मास्टर यांनी वसतिगृहाला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच दोन दिवसांत समस्या सोडविण्याचे व गृहपालाची बदली करण्याचे आश्वासन दिले.