आदिवासींना प्रोत्साहन देणारा ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 09:05 PM2022-12-21T21:05:30+5:302022-12-21T21:06:06+5:30

Nagpur News स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरात ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

'Tribal Industrial Park' to promote tribals in February | आदिवासींना प्रोत्साहन देणारा ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारीत

आदिवासींना प्रोत्साहन देणारा ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारीत

Next
ठळक मुद्दे विदर्भ विकास परिषद; विदर्भातील प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी मंजूर

नागपूर : विदर्भात नैसर्गिक साधने विपुल प्रमाणात असून उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरात ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होणार आहे. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत सरकार उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विदर्भातील प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर व राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी आयोजित विदर्भ विकास परिषदेचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खा. अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, प्रदीप पेशकर, फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन हिंगणाचे अध्यक्ष कॅ. चंद्रमोहन रणधीर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयडीसी असोसिएसन ऑफ अमरावतीचे अध्यक्ष किरण पातुरकर, चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, चेंबरचे विजय वेदमुथा, चेंबरच्या युवा विंगचे चेअरमन संदीप भंडारी, चेंबरचे राज्य कार्यकारिणी सदस्य विनय आकुलवार, चेंबरचे नामकर्ण अवारे, चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

उद्योजकांना २४ हजार कोटींची प्रोत्साहन अनुदान राशी

सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात राज्यातील उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यात २४ हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी दिली आहे. मार्चपर्यंत उर्वरित राशी देण्यात येईल. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीची महिन्याला दोन वेळा बैठक घेते.

परिषदेत दिवसभरात एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. विदर्भातील उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन या विषयांवर वरिष्ठ शासकीय अधिकारी, तज्ज्ञ, वित्तीय संस्थांचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. आ. प्रकाशअण्णा आवाडे यांनी राज्यातील उद्योग-व्यवसायाची सद्यस्थिती मांडली.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांसाठी ४१ हजार कोटींचा निधी

गेल्या तीन महिन्यात ७१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यापैकी ४१ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. यामुळे ३२ हजार रोजगार मिळेल.

पर्यटन विकासासाठी ४०० कोटींची तरतूद : मंगलप्रभात लोढा

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास, पर्यटन, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. ते म्हणाले, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध होतील.

विदर्भ विकास परिषदेची वैशिष्ट्ये :

- उद्योग, व्यापार, कृषी, ऊर्जा, इनोव्हेशन, पर्यटन या पाच महत्त्वाच्या विषयावर चर्चा.

- तीन महिन्यांतच ७१ हजार कोटी रुपयांची तरतूद, त्यापैकी ४१ हजार कोटी रुपये विदर्भातील प्रकल्पांसाठी मंजूर.

- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद.

- राज्यात स्किल सेंटर, इनोव्हेशन सेंटरला चालना मिळणार.

- उद्योजकांना दोन टप्प्यात २४ हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी.

Web Title: 'Tribal Industrial Park' to promote tribals in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.