आदिवासी क्रांतिवीराची प्र‘शासकीय’ अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:54 AM2018-10-01T10:54:57+5:302018-10-01T10:58:11+5:30
आदिवासी क्रांतिकारकांच्या वीरगाथेकडे इतिहासाने कायमच दुर्लक्ष केले आहे. जेव्हाकधी असा दुर्लक्षित वीरांचा इतिहास प्रकाशात आणण्याची वेळ येते, त्यावेळीही काहीतरी घोडचूक करून चुकीचाच इतिहास प्रकाशित केला जातो.
मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी क्रांतिकारकांच्या वीरगाथेकडे इतिहासाने कायमच दुर्लक्ष केले आहे. जेव्हाकधी असा दुर्लक्षित वीरांचा इतिहास प्रकाशात आणण्याची वेळ येते, त्यावेळीही काहीतरी घोडचूक करून चुकीचाच इतिहास प्रकाशित केला जातो. वीर बाबुराव शेडमाके हे आदिवासींचे प्रेरणास्रोत आणि १८५७ च्या उठावातील एक महान क्रांतिकारक. मात्र आदिवासी विकास विभागाच्या लेखी हे क्रांतिकारक १८५४ ला जन्माला आले, १८५७ च्या उठावात सहभागी झाले आणि १८५८ ला फासावरही चढले. अवघ्या चार वर्षांच्या वयात कुणी इतकी क्रांती करेल, असा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र आदिवासी विकास विभागानेच आदिवासी क्रांतिकारकांच्या बाबतीत चुकीची माहिती प्रकाशित करून अवहेलना केली आहे.
आदिवासी विकास विभागाने आपल्या योजनांची माहिती प्रकाशित करण्यासाठी २०१८ चे कॅलेंडर प्रकाशित केले. या कॅलेंडरवर आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे छायाचित्र व त्यांची माहिती प्रकाशित केली; सोबतच विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी दर्जेदार कागदाचा वापर करण्यात आला. त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व राज्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कॅलेंडरवर शासनाने तीन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. हे कॅलेंडर सर्व शासकीय कार्यालयात, आदिवासी वसतिगृह, आश्रमशाळा, प्रकल्प कार्यालय येथे वितरित करण्यात आले आहे.
या कॅलेंडरमध्ये क्रांतिवीर शामा दादा कोलाम, वीर बाबुराव शेडमाके, क्रांतिसूर्य राघोजी भांगरे, क्रांतिकारी तंट्या भिल, राणी दुर्गावती, आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा आदी क्रांतिकारकांचा समावेश आहे. यात वीर बाबुराव शेडमाके यांची चुकीची माहिती प्रकाशित केली आहे.
प्रकाशित केलेली माहिती अशी...
‘दि. १२ मार्च १८५४ साली जन्मलेले वीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश अमलाखालील चंद्रपूर येथे सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध बंड उभे केले. इंग्रजांविरुद्ध १८५७ च्या स्वातंत्र्य समरात ५०० आदिवासी युवकांना एकत्र करून सेना उभारली व हल्लाबोल करून त्यांना जेरीस आणले. २९ एप्रिल १८५८ ला चिंचगुडी येथे टेलिफोन शिबिरावर हल्ला करून दोन इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले. त्यामुळे १८ सप्टेंबर १८५८ ला बाबुराव शेडमाके हाती लागत नाही म्हणून इंग्रजांनी कूटनीतीचा वापर करून त्यांना अटक केली व चांदा सेंट्रल जेलला आणले. इंग्रजांनी २१ आॅक्टोबर १८५८ रोजी त्यांना फाशी दिली गेली व वीर बाबुराव शेडमाके हुतात्मा झाले.’
आदिवासी लेखकांची नाराजी
१८५४ मध्ये जन्म होणे, १८५८ मध्ये फाशी देणे हे संयुक्तिकतच नाही. मुळात वीर शेडमाके यांचा इतिहास विभागाने जाणूनच घेतला नाही. शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ ला अहेरीतील (मोलमपल्ली) गावात झाला. वयाच्या १३ व्या वर्षांपासून विद्रोहाला सुरुवात केली. उच्च शिक्षण त्यांनी रायपूरला घेतले. इंग्रजांच्या विरोधात १८५६ मध्ये जंगम सेना स्थापन केली. त्यात ५०० आदिवासी युवक भरती झाले. त्यांनी इंग्रजांवर हल्ले केले. त्यांनी दोनवेळा इंग्रजांना हरविले. त्यांना इंग्रजांनी कपटाने पकडले. तेव्हा १९ इंग्रजांना एकाच वेळी ठार केले. पण इंग्रजांची सेना जास्त असल्याने त्यांना पकडण्यात आले आणि २१ आॅक्टोबर १८५८ ला फाशी देण्यात आली. आदिवासी विकास विभागाने हे कॅलेंडर छापताना हा इतिहास जाणून घेतला नाही. त्याचा परिणाम म्हणून या क्रांतिकारकाचा हास्यास्पद आणि चुकीचा इतिहास विभागाने प्रकाशित केला आहे.
- मारोती उईके, आदिवासी लेखक
भोंगळ कारभाराचा हा नमुना आहे. आदिवासींसाठी येणाऱ्या निधीचा अशाप्रकारे दुरुपयोग होत आहे. अशी चुकीची माहिती प्रकाशित करण्यापेक्षा दुर्गम भागात विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या समाजावर हा निधी खर्च केला असता तर तो सत्कर्मी लागला असता.
- दिलीप मडावी, अध्यक्ष, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन
आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची समिती तयार करायला हवी होती. त्यांच्याकडून तपासणी करून कॅलेंडरवर माहिती प्रकाशित करणे गरजेचे होते. विभागाने हास्यास्पद माहिती प्रकाशित करून विभागाचीच मान खाली घातली आहे.
दिनेश शेराम, अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद