राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:54 AM2018-08-29T10:54:29+5:302018-08-29T10:55:55+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही.

Tribal students in the state are waiting for scholarship | राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देविभागांच्या असमन्वयात शिष्यवृत्ती रखडली सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी विभागाकडून राबविण्यात येते. पण शिष्यवृत्तीचे वितरण माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येते. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने २०१६ -२०१७ व २०१७-१८ या वर्षातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.
आदिवासी विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १ ते १० च्या विद्यार्थ्यांना १००० ते २००० रुपये दरम्यान शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज दाखल करायचे होते. विद्यार्थ्यांना अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडायचा होता. गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विभागाने शिष्यवृत्तीचे हे काम ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिले आहे. आदिवासी विभाग आलेल्या अर्जानुसार शिक्षण विभागाला निधी उपलब्ध करून देते. शिक्षण विभागाला तो निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचा आहे. पण २०१६-१७ व २०१७-१८ या दोन्ही वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची ओरड शाळेकडून होत आहे. शाळांनी यासंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभाग व आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडेही पाठपुरावा केला. पण शिष्यवृत्तीचा गुंता काही सुटला नाही. त्यामुळे विद्यार्थी आजही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहे. तिकडे पालकांकडून शिक्षकांना शिष्यवृत्तीची विचारणा होत असल्याने शिक्षक ठोस कारण सांगण्यास हतबल ठरत आहे. त्यामुळे पालकांकडून शिक्षकांवरच संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात आदिवासी विभागाचे नागपूर प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या याद्या व निधी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा अहवालही मागितला आहे. परंतु त्यांच्याकडून अहवाल आलेला नाही.
यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागातील शिष्यवृत्तीचे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की २०१६-१७ चा निधी वाटप करण्यात आला आहे. २०१७-१८ च्या याद्या आल्या आहेत. आठवड्याभरात विद्यार्थ्यांचा खात्यात पैसे जमा होईल.
शिष्यवृत्तीच्या बाबतीत दोन्ही विभागाकडून वेगवेगळे खुलासे आले असले तरी, २०१५-१६ पासूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी जोतोय कुठे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Tribal students in the state are waiting for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.