आशा सावदेकर यांना साहित्य जगताची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:27+5:302021-04-23T04:09:27+5:30
आता ही अभ्यासू व्यक्ती कधी दिसणार नाही : एलकुंचवार त्यांची शेवटची वर्षे अतिशय वाईट गेली, याचे मनाेमन वाईट वाटते. ...
आता ही अभ्यासू व्यक्ती कधी दिसणार नाही : एलकुंचवार
त्यांची शेवटची वर्षे अतिशय वाईट गेली, याचे मनाेमन वाईट वाटते. त्या अतिशय अभ्यासू, व्यासंगी व उत्कृष्ठ शिक्षक हाेत्या. मित्र म्हणूनही फार चांगल्या हाेत्या. त्यांचे पती बाळासाहेब यांच्याशी माझे मैत्रीचे ऋणानुबंध हाेते. ते गेल्यापासून आशाताई नि:शब्द झाल्या आणि सर्व विस्कटले. आशा माझ्याहून लहान हाेती पण अतिशय प्रेमळ व व्यासंगी हाेती. आता अशी अभ्यासू माणसे पुन्हा दिसणार नाहीत, याचे अतीव दु:ख वाटते.
- महेश एलकुंचवार, ज्येष्ठ साहित्यिक
अशा मैत्रिणीचा एकाकी अंत दुर्दैवी : बगे
आशा ही माझ्यापेक्षा लहान असली तरी अतिशय जवळची मैत्रीण हाेती. अनेक वर्षांचा स्नेह हाेता. गेल्या काही महिन्यांपासून तिला भेटण्यास जाणे-येणे बंद झाले. मात्र फाेनवरून तिच्या प्रकृतीची विचारणा करीत हाेते. तिला नाटक, कवितांचा व्यासंग व अभ्यास हाेता. तिच्या अनेक पुस्तकांतून ताे जाणवताे. मात्र आयुष्याच्या दु:खाने तिला गिळून टाकले. अशा माेठ्या व्यासंगाचा असा एकाकी अंत व्हावा, हे अतिशय वेदनादायी आहे.
- आशाताई बगे, ज्येष्ठ साहित्यिक
साहित्य जगतात माेठी पाेकळी : काळे
आशाताई व माझा जवळजवळ ५० वर्षांचा ऋणानुबंध हाेता. त्या ज्येष्ठ भगिनीप्रमाणे हाेत्या. विद्यापीठाच्या मराठी विभागात आम्ही बरीच वर्षे एकत्रित हाेते. काव्य समीक्षा हा त्यांचा व माझा आवडीचा लेखन प्रांत असल्याने सतत त्यांच्याशी काव्यावर चर्चा व्हायच्या. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांवरील त्यांची समीक्षा अतिशय मूलगामी व लक्षणीय आहे. विदर्भातील कवींची अत्यंत जिव्हाळ्याने केलेली त्यांची समीक्षा त्यांच्या सहृदय रसिकतेचा परिचय देणारी आहे. आशाताईंना भाषाविज्ञानात उत्तम गती हाेती व उत्कृष्ट वक्तृत्वाची देणगी त्यांना हाेती. त्यांच्या जाण्याने नागपुरातील साहित्य जगतामध्ये पाेकळी निर्माण झाली आहे. मी त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करताे.
- अक्षयकुमार काळे, माजी मराठी संमेलनाध्यक्ष
डॉ. आशा सावदेकर यांची ओळख महाराष्ट्राला साहित्याच्या मर्मग्राही रसज्ञ समीक्षक आणि विद्यापीठातील मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी दुहेरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकाचवेळी ऋजुता आणि मनस्वीपणा होता. सावदेकरांनी आयुष्यभर आधुनिक मराठी कवितेच्या अभ्यासाचा ध्यास घेतला होता. त्यातही विदर्भातील जुन्या महत्त्वाच्या कवींची त्यांनी केलेली पुनर्मांडणी महत्त्वाची आहे. हे त्यांचे महत्त्वाचे योगदान सांगता येईल. ‘युगवाणी’ या मासिकांचे त्यांनी काही काळ अत्यंत साक्षेपी शैलीने संपादन केले होते. आमच्यासारख्या नवागतांना त्यांनी त्यात जाणीवपूर्वक स्थान दिले होते, ही गोष्टही मला फार महत्त्वाची वाटते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातर्फे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
-डॉ. प्रमोद मुनघाटे, विभाग प्रमुख, स्नातकोत्तर मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ