जीवन नौकेच्या अमुच्या दीपस्तंभ भीम आहे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 09:36 PM2020-12-06T21:36:36+5:302020-12-06T21:38:22+5:30
भारतीय संविधान निर्मात्याला असंख्य अनुयायांनी कृतज्ञपणे अभिवादन केले. रविवारी सकाळपासूनच दीक्षाभूमी आणि संविधान चौकात अभिवादनाचे सत्र सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिढ्यान्पिढ्या जातीच्या जोखाडात अडकून अन्याय सहन करणाऱ्या हीनदीन समाजाला प्रकाशाची दिशा दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन हे दीपस्तंभ ठरले. चंदनासमान देह झिजवून पददलितांना या देशात सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी आपला देह ठेवला. भारताला अखंड लोकशाहीच्या मार्गावर आणून सोडणाऱ्या महामानवाचा आज ६४ वा महापरिनिर्वाण दिन. भारतीय संविधान निर्मात्याला असंख्य अनुयायांनी कृतज्ञपणे अभिवादन केले. रविवारी सकाळपासूनच दीक्षाभूमी आणि संविधान चौकात अभिवादनाचे सत्र सुरू झाले. लोक कुटुंबासह दीक्षाभूमीवर गोळा झाले होते. संविधान चौकातही गर्दी होती. यासह विविध सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक सुरक्षेचे नियम पाळूनच अनुयायांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली होती. चेहऱ्यावर मास्क लावूनच आतमध्ये प्रवेश दिला जात होता आणि शारीरिक अंतर राहील याची काळजी घेतली जात होती. दीक्षाभूमीवर तशी व्यवस्थाही करण्यात आली होती. स्तुपामध्ये गर्दी होणार नाही, यासाठी एकेका व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. नमन केल्यानंतर आलेल्या प्रत्येक कुटुंबाने दूर दूर राहून विसावा घेतला. हजारो लोक परिसरात होते, पण अंतर पाळून होते. काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत मार्ग बंद ठेवण्यात आला होता. दुसरीकडे संविधान चौकातही अभिवादनासाठी लोकांनी हजेरी लावली. हा सिलसिला सायंकाळी उशिरापर्यंत चालला होता. मात्र संसर्गाचा धोका होणार नाही, याची काळजी घेतली जात होती.
अनेकांनी घरूनच ऑनलाईन अभिवादन करण्यावर भर दिला. विविध संस्था, संघटनांनी ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करून महामानवाला श्रद्धासुमन अर्पण केले.