जॉर्ज फर्नांडिस यांना लोकप्रतिनिधींनी वाहिली शब्दसुमनांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:42 AM2019-01-30T11:42:24+5:302019-01-30T11:42:48+5:30
माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना नागपुरातील लोकप्रतिनिधींनी आपली शब्दसुमनांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना नागपुरातील लोकप्रतिनिधींनी आपली शब्दसुमनांजली अर्पण केली.
प्रामाणिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड
जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाने कष्टकरी, कामगारांसाठी प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. फर्नांडीस यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या कल्याणासाठीच खर्ची घातले. भारतातील कामगार चळवळीला त्यांनी आपल्या संघर्षशील नेतृत्त्वाने नवीन दिशा दिली. कामगारांच्या हक्कासाठी लढत असताना स्वत:च्या जीवाचीही त्यांनी पर्वा केली नाही. वंचितांचे कल्याण हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांच्या प्रामाणिक नेतृत्त्वाची उणीव नेहमीच जाणवणार आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री
निष्ठेने जीवन जगणारा नेता
जॉर्ज फर्नांडिस यांचा एकेकाळी देशातील सर्व कामगार संघटना व युनियन्सवर प्रभाव होता. एका शब्दात टॅक्सी, आॅटो व रेल्वेची चाके थांबविण्याची ताकद त्यांच्यात होती. मात्र त्यांनी आयुष्यभर समाजवादी विचारांशी कधीही फारकत घेतली नाही. मंत्री असतानाही ते स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे, एवढा वैचारिक साधेपणा त्यांच्यात होता. माझी वैयक्तिक आठवणही आहे. माझे आॅपरेशन झाले तेव्हा रुग्णालयात असताना ते आवर्जून भेटायला आले होते. निष्ठेने जीवन जगणाऱ्या नेत्याला आपण गमावले आहे.
- गिरीश गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
कामगार चळवळीचा प्रणेता काळाने हिरावला
जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातले एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. एका हाकेवर मुंबई बंद करण्याची ताकद असलेला लढवय्या कामगार नेता म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रीय राजकारणात जॉर्ज फर्नांडिस यांचे महत्त्वाचे स्थान होते. रेल्वे, उद्योग आणि संरक्षण ही महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. ते संरक्षण मंत्री असताना पोखरणची अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली, तर कारगीलच्या युद्धात आॅपरेशन विजय करत पाकिस्तानला पाठीमागे धाडण्यात त्यांना यश आले. त्यांच्या दु:खद निधनाने एक नि:स्वार्थी नेता तसेच कामगारांचा पाठीराखा व कामगार चळवळीचा प्रणेता काळाने हिरावला.
-डॉ.आशिष देशमुख, माजी आमदार