थायलंडच्या राजाला नागपुरात श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:37 AM2017-10-27T01:37:42+5:302017-10-27T01:37:53+5:30
थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध देशांमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध देशांमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे. नागपुरातही बौद्ध बांधवांतर्फे गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अहल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हील लाईन्स येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सिनेअभिनेते गगन मलिक, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, नितीन गजभिये यांच्यासह बौद्ध भिक्खू संघ सहभागी झाले होते. यावेळी राजे भूमीबोल यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी वेचले, त्यांनी एका अविकसित देशाला विकासनशील देशाच्या रांगेत उभे केले. थायी जनतेचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधननंतर एक वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.
भारताशी मित्रत्वाचे संबंध
भूमीबोल आदुलादेलज यांचे भारताशी मित्रत्वाचे संबंध होते. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. महाबोधी महाविहाराच्या घुमटाकरिता २८९.०४२ किलो सुवर्ण त्यांनी दान दिले होते. बोधगयेच्या परिसरात त्यांनी १८ कोटीचे नीरांजनावास नावाचे थायी टेम्पल उभारले. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीसाठी भव्य बुद्धमूर्ती पाठविली.