आचार्य विद्यासागर महाराजांना सरसंघचालक, सरकार्यवाहांची श्रद्धांजली
By योगेश पांडे | Published: February 18, 2024 04:35 PM2024-02-18T16:35:51+5:302024-02-18T16:36:47+5:30
महान तीर्थंकरांच्या उत्कृष्ट परंपरांना आपल्या जीवनात मूर्त रूप देणारे जैन धर्माचे महान आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली.
नागपूर : जैन धर्माचे आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या समाधीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपण सर्वांनी अधिक दृढनिश्चयाने आणि समर्पणाने त्यांच्या मार्गावर चालत राहावे आणि त्या आदर्शांना जलद गती द्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महान तीर्थंकरांच्या उत्कृष्ट परंपरांना आपल्या जीवनात मूर्त रूप देणारे जैन धर्माचे महान आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली. त्यांनी १९६८ मध्ये दीक्षा ग्रहण केल्यापासून सातत्याने सत्य, अहिंसा, अपरिग्रह, आचार्य, ब्रह्मचर्य यांचे अविरत आचरण करून या पंचमहाव्रतांच्या देशव्यापी प्रचारासाठी स्वतःला समर्पित केले. लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन, पूज्य आचार्यांनी आपल्या जीवनात शेकडो मुनी व आर्यिकांना दीक्षा दिली तसेच परोपकारी कार्यांसाठी नेहमीच प्रेरणा आणि आशीर्वाद दिले. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी गोशाळा, शैक्षणिक संस्था, हातमाग केंद्रे आणि विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना सुरू केल्या.
तुरुंगात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे अभूतपूर्व कार्य केवळ त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. हा देश आपल्या उदात्त शिकवण तसेच जीवन आदर्श घेऊन पुन्हा उभा राहावा आणि सध्याच्या काळात जगाला नवी दिशा द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे संपूर्ण जीवन या आदर्शांसाठी पूर्णपणे समर्पित होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कठोर ध्यान चालू ठेवले. आज लाखो लोक त्या आदर्शांचे पालन करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.