सहारा वाळवंटाच्या माथ्यावर अतुल फडकविणार तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:39 AM2018-03-31T00:39:31+5:302018-03-31T00:39:44+5:30

सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून केलेला सराव...दंदे फाऊंडेशनचे मिळालेले पाठबळ आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सहारा वाळवंटाच्या माथ्यावर तिरंगा फडकविण्याचे अतुलकुमारने उराशी बाळगलेले स्वप्न...

Tricolor will be hoasting at the top of the Sahara desert | सहारा वाळवंटाच्या माथ्यावर अतुल फडकविणार तिरंगा

सहारा वाळवंटाच्या माथ्यावर अतुल फडकविणार तिरंगा

Next
ठळक मुद्देजगातील सर्वात कठीण २५० कि.मी.ची मॅराथॉन : दंदे फाऊंडेशनचे मिळाले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून केलेला सराव...दंदे फाऊंडेशनचे मिळालेले पाठबळ आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सहारा वाळवंटाच्या माथ्यावर तिरंगा फडकविण्याचे अतुलकुमारने उराशी बाळगलेले स्वप्न...
सर्वकाही स्वप्नवत वाटावे असेच, परंतु हे वास्तव आहे. उद्या शनिवार ३१ मार्च रोजी अतुलकुमार या स्पर्धेसाठी नागपूरहून निघतो आहे. मॅराथॉनमध्ये भारताचा तिरंगा फडकविण्याचा त्याचा मानस आहे. दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांनी शुक्रवारी तिरंगा त्याचा स्वाधीन करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या सर्वांनी मिळून पत्रकारांशी संवाद साधला. स्पर्धा यशस्वीतेने पूर्ण करून विदेशात भारताचा तिरंगा फडकावूनच मी मायदेशी परतणार, असा ठाम विश्वास अतुलकुमारने व्यक्त केला. स्पर्धेत जगभरातील ६० देशांचे १०५० धावपटू सहभागी होणार आहेत. अतुलकुमार या स्पर्धेत धावणारा एकमेव भारतीय धावपटू आहे. अतुल पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत असून शनिवारी मुंबईमार्गे मोरोक्कोला रवाना होत आहे.
नकाशा व होकायंत्राच्या मदतीने शोधावा लागणार स्पर्धेचा मार्ग
अतुलकुमार म्हणाला, ५० ते ५५ अंश तापमानात होणारी ही स्धर्पा ८ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. सलग सात दिवसानंतर १४ एप्रिलला संपेल. त्यापूर्वीचे दोन दिवस स्पर्धेची माहितीसह वैद्यकीय तपासणी व अन्य तयारी करण्यासाठी असणार आहे. २५० किलोमीटरची स्पर्धा सहा टप्प्यामध्ये होणार आहे. स्पर्धेचे आयोजक फ्रान्सचे पॅट्रीक बेअर यांनी स्पर्धेचे अनेक ‘सिक्रेट’ कायम ठेवले आहे. स्पर्धकाला कोणत्या स्टेजमध्ये किती अंतर धावायचे व स्पर्धेचा मार्ग कोणता राहील हे जाहीर केले नाही. विशेष म्हणजे, स्पर्धेचा मार्ग नकाशा आणि होकायंत्राच्या मदतीने शोधावा लागणार आहे. हा मार्गही सपाट नसणार तर डोंगर, दऱ्यातून गेलेला आहे.
दररोज केवळ साडेदहा लिटर पाणी
अतुलकुमार म्हणाला, ५० डिग्रीच्यावर तापमानात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकाला कुणाचीही मदत मिळणार नाही. जबाबदारी स्वत:च घ्यावी लागणार आहे. साप, विंचू व वाळूच्या वादळाचा धोक्यासारखे अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यातील एक आव्हान म्हणजे, रोज केवळ साडेदहा लिटर पाणी मिळणार आहे.
अतुलकुमार म्हणााला, पाठीवर २५ किलो वजन घेऊन २५० किलोमीटरचे अंतर ओलांडायचे आहे. पाठीवरील ‘किट’मध्ये स्लिपींग बॅगसह, सात दिवस पुरेल एवढ्या खाण्यापिण्याच्या वस्तूसह, माऊंटन स्टीक, टॉर्च, सोलर बॅटरी, सर्व्हायव्हल ब्लँकेट, ड्राय फ्रुट्ससह विविध औषधांचा समावेश असणार आहे. स्पर्धकासह पायलट म्हणून कोणही व्यक्ती सोबत राहणार नाही. स्पर्धकांवर दोन हॅलिकॉप्टरची पाहणी राहील. दंदे फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे जगातील सर्वात कठीण स्पर्धेत मी सहभागी होत असल्याचे अतुलकुमार चौकसेने आवर्जून सांगितले.
अतुल देशाची मान उंचावणार : डॉ. पिनाक दंदे
सहारा वाळवंटातील ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा असली तरी अतुलकुमारची सकारात्मकता, आत्मविश्वास, जिद्द व गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या तयारीमुळे २५० किलोमीटरची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून देशाची मान उंचावेल, असा विश्वास दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी व्यक्त केला. डॉ. दंदे म्हणाले, अतुलमधील साहस आणि परिश्रम घेण्याची जिद्द पाहूनच दंदे फाऊंडेशनने त्याला मदतीचा हात दिला. स्पर्धेपूर्वी अतुलचे मानसिक व शारीरिक क्षमता सक्षम करण्यात आली. वाळवंटात ही स्पर्धा होणार असल्याने कन्हान नदीच्या पात्रात सराव करून घेतला. तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ‘ट्रेडमिल’च्या खोलीत ‘हिटर’च्यामदतीने तापमान वाढवून धावण्याचाही सराव केला. कमीत कमी वजन व स्नायूंना बळकटी देण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. धावतांना नाक व कानाला दुखापत होणार नाही व बुटमध्ये वाळू जाणार नाही, याबद्दलही साहित्य तयार करून घेण्यात आले. अतुलमध्ये जगावेगळी कामगिरी करण्याची क्षमता असून तो या कठीणातील कठीण स्पर्धाही यशस्वी करेल, असेही डॉ. दंदे म्हणाले.

 

Web Title: Tricolor will be hoasting at the top of the Sahara desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.