‘हब अॅण्ड स्पोक’ मॉडेलचा त्रिपक्षीय करार
By admin | Published: February 9, 2016 02:38 AM2016-02-09T02:38:12+5:302016-02-09T02:38:12+5:30
दहावीच्या मुलांची कलचाचणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलाचा अहवाल त्यांच्या पालकांना देण्यात येईल.
राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पुढाकार
नागपूर : दहावीच्या मुलांची कलचाचणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलाचा अहवाल त्यांच्या पालकांना देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे ते शिक्षण त्यांना देऊन त्यांचे करियर घडविण्याचा भविष्यात प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी नागपुरात केले.
रविभवन येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या पुढाकाराने संस्था-उद्योग समन्वय वृद्धिंगत करण्यासाठी हब अॅण्ड स्पोक मॉडेलचा त्रिपक्षीय करार विनोद तावडे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित करण्यात आला. यामध्ये चॅम्पियन उद्योग म्हणून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व पॅट्रान संस्था म्हणून शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यामध्ये दुवा म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ कार्यरत राहणार आहे. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आशुतोष त्रिपाठी, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य सी.एस. थोरात उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटी, उद्योजकांची तज्ज्ञ व्याख्याने व मार्गदर्शन, विद्यार्थी व शिक्षकांचे औद्योगिक प्रशिक्षण, उद्योगावर आधारित प्रकल्प यांचा समावेश राहणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून उद्योगांना कुशल कारागीर मिळण्यास मदत होईल. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.(प्रतिनिधी)