‘ट्रीपल आयटी’ ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 02:32 AM2016-07-04T02:32:24+5:302016-07-04T02:32:24+5:30
उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रीपल आयटी’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे.
४ कोटींचा निधी : ७४ पदांना मान्यता, ९ विभागप्रमुखांची नियुक्ती
नागपूर : उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रीपल आयटी’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे. स्थापनेच्या पहिल्या वर्षातच येथील सर्वच्या सर्व ८० जागांवर प्रवेश झाले आहेत. नवीन संस्था असूनदेखील विद्यार्थ्यांनी नागपूरवर विश्वास दाखविला आहे. ‘ट्रीपल आयटी’ला जागेचे हस्तांतरण करण्यात आले असून विकास कामांसाठी चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रविवारी ही माहिती दिली.
‘ट्रीपल आयटी’नंतर बऱ्याच उशिरा ‘आयआयएम’ची घोषणा झाली. परंतु ‘आयआयएम’चे वर्ग मागील वर्षी सुरूदेखील झाले. त्यामुळे ‘ट्रीपल आयटी’चे वर्ग कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आॅगस्टपासून येथील वर्ग सुरू होतील, असा निर्णय झाला आहे. ‘ट्रीपल आयटी’संदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद हाऊस येथे आढावा घेतला. यावेळी यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, ‘ट्रीपल आयटी’चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.ए.जी.कोठारी, प्रबंधक के.एन.डाखले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कुंटे यांनी ‘ट्रीपल आयटी’साठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांसंदर्भात माहिती दिली. ‘बीएसएनएल’च्या ‘आरटीटीसी’ची (रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर) येथे या संस्थेचे तात्पुरते वर्ग सुरू असून येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ट्रीपल आयटी’ची पहिल्या वर्षीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून येथे ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्यादेखील झाल्या आहेत. येथील ७४ पदांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.(प्रतिनिधी)
‘स्मार्ट क्लासरूम’ची व्यवस्था करा
‘ट्रीपल आयटी’ही देशातील नामांकित संस्था असून सुरुवातीपासूनच याचा दर्जा राखण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तात्पुरता ‘कॅम्पस’देखील ‘डिजिटल’ व्हायला हवा व वर्गखोल्यादेखील ‘स्मार्ट’ करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. ‘ट्रीपल आयटी’च्या निर्मितीसाठी शासनातर्फे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.