नागपुरात  ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 07:05 PM2018-08-21T19:05:30+5:302018-08-21T19:21:58+5:30

आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे, त्याला असुविधा होऊ नये यासाठी पालक त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. महाविद्यालयात प्रवेश करण्याअगोदरच त्यांच्या हाती दुचाकीच्या चाव्या देण्यात येतात. मात्र त्यांच्या जीवावरील धोक्याबाबत तेवढीच चिंता करताना दिसतात का? हा प्रश्न कळीचा आहे अन् दररोज शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगाना धावताना दिसतो आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ तर बहुतांश वेळा वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळतो. या गंभीर प्रश्नावर उपाय तसा सोपा आहे, मात्र गंभीर अपघात झाल्यावरच प्रश्नाचे निवारण करण्यासाठी जाग येणार का ?

'Triple seat' is dear beyond life in Nagpur | नागपुरात  ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी

नागपुरात  ‘ट्रिपल सीट’ जीवाहून प्यारी

Next
ठळक मुद्देकधी घेणार विद्यार्थी शिकवणकॉलेजमध्ये जाताना नियमांना तिलांजलीएक चूक ठरू शकते जीवघेणीलोकमत ऑन दि स्पॉट रिपोर्ट

सुमेध वाघमारे / योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे, त्याला असुविधा होऊ नये यासाठी पालक त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. महाविद्यालयात प्रवेश करण्याअगोदरच त्यांच्या हाती दुचाकीच्या चाव्या देण्यात येतात. मात्र त्यांच्या जीवावरील धोक्याबाबत तेवढीच चिंता करताना दिसतात का? हा प्रश्न कळीचा आहे अन् दररोज शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगाना धावताना दिसतो आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ तर बहुतांश वेळा वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळतो. या गंभीर प्रश्नावर उपाय तसा सोपा आहे, मात्र गंभीर अपघात झाल्यावरच प्रश्नाचे निवारण करण्यासाठी जाग येणार का ?
महाविद्यालयीनविद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सर्वात जास्त प्रमाणात वाहतुकीचे नियम तोडले जात असल्याचे उपराजधानीत चित्र आहे. तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर तरी पालक, पोलीस व महाविद्यालय प्रशासनाकडून काही तरी पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ‘लोकमत आॅन द स्पॉट’मध्ये दिसून आलेल्या वास्तवात असे काहीही झाले नसल्याचे दिसून आले. अर्ध्याहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे आढळून आले. ना ‘हेल्मेट’चा वापर, हवी तशी दुचाकी चालविणे, ‘ट्रिपल’ काय एकेका गाडीवर चार विद्यार्थी जाणे, विद्यार्थिनींकडून बिनधास्तपणे ‘हेडफोन’चा वापर करणे, ‘मोबाईल’वर बोलणे, असे प्रकार निदर्शनास आले. आश्चर्याची बाब म्हणजे महाविद्यालयीन परिसरांमध्ये हे प्रकार जास्त होते व महाविद्यालयांकडून कुठेही याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांना पोलिसांचा, पालकांचा आणि महाविद्यालयाचा धाक नसल्याने निष्काळजीपणाचा कळस होत आहे. या थराराला आवरणारी यंत्रणा आणखी एका मोठ्या अपघाताच्या प्रतीक्षेत तर नाही ना, असा प्रश्न पडला आहे. ‘लोकमत’च्या चमूने सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून किती विद्यार्थी वाहतूक नियमांचे पालन करतात याची चाचपणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
शिवाजी विज्ञान महाविद्यालय
काँग्रेसनगर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात दहा-बारा विद्यार्थी सोडल्यास विद्यार्थ्यांपासून ते विद्यार्थिनीपर्यंत कुणीच हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे आढळून आले. या महाविद्यालयात ट्रिपल सीट येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असलीतरी वाहन चालविताना हेडफोन व मोबाईलचा वापर करणाºया विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्याचे दिसून आले.
प्रेरणा महाविद्यालय
प्रेरणा महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीही हेल्मेटचा करीत नसल्याचे दिसून आले. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उभे राहून काही वेळ गप्पा मारून ट्रिपल सीट बसून जात होते. यात मुलींची संख्या मोठी असल्याचे आढळून आले. रस्ता क्रॉस करतानाही कानाला मोबाईल लावून वाहन चालविणारे विद्यार्थी दिसून आले.
सीपी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय
सीपी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयातही इतर महाविद्यालयांसारखेच चित्र होते. वेगाने दुचाकी दामटत कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी येथे जणू स्पर्धा लागल्यासारखेच चित्र होते. रस्त्यावर दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलणे, झिकझॅक पद्धतीने वाहन चालविणे, ट्रिपल सीट बसवून वेगाशी स्पर्धा करणे हे नित्याचेच चालत असल्याचे दिसून आले.
धरमपेठ वाणिज्य महाविद्यालय
दुपारच्या सुमारास धरमपेठ वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील मार्गावर अनेक विद्यार्थ्यांची ‘स्टंटबाजी’ सुरू होती. एकचतुर्थांशहून अधिक विद्यार्थी तर ‘राँग साईड’ने दुचाकी चालवताना दिसून आले. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे तर ‘हेल्मेट’देखील नव्हते. कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, जोरजोरात ‘सायलेन्सर’चा आवाज करणे, असे प्रकारदेखील येथे पाहायला मिळाले.
जी.एच.रायसोनी महाविद्यालय
हिंगणा मार्गावर जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अतिशय बेदरकारपणे दुचाकी चालविण्यात येत असल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी तर ‘ट्रिपल सीट’ जात होते. अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांकडून ‘हेल्मेट’चा वापर होत नसल्याचे दिसून आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळच ‘मेट्रो’चे काम सुरू असतानादेखील भरधाव वेगाने विद्यार्थी महाविद्यालयाकडे येत असल्याचे चित्र होते.
प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय
प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातदेखील वेगळी परिस्थिती नव्हती. हिंगणा मार्गाकडून महाविद्यालयाकडे जाणाºया चढावावर भरधाव वेगाने दुचाकी दामटण्यात येत होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे काही विद्यार्थिनीदेखील ‘ट्रिपल सीट’ होत्या. सुरक्षारक्षकांकडून कुणालाही टोकण्यातदेखील येत नव्हते.
धरमपेठ विज्ञान महाविद्यालय
‘मेट्रो’चे काम सुरू असल्यामुळे धरमपेठ विज्ञान महाविद्यालयासमोरील मार्ग अरुंद झाला आहे; शिवाय ‘बॅरिकेडस्’मुळे समोरील येणारी वाहनेदेखील नीट दिसत नाही. मात्र विद्यार्थ्यांचा बेजबाबदरपणा येथेदेखील दिसून आला. आश्चर्याची बाब म्हणजे येथूनच काही मीटर अंतरावर तीन विद्यार्थिनींचा बळी गेला. मात्र त्याच मार्गावर काही विद्यार्थिनी चक्क गर्दीच्या वेळी ‘राँग साईड’ने येताना दिसून आल्या. महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांना टोकण्यासाठी काहीही व्यवस्था उभारण्यात आलेली नाही.
‘एलएडी’ महाविद्यालय
या महाविद्यालयाजवळ विद्यार्थिनी वाहतुकीची पर्वा न करता दुचाकी चालविताना दिसून आल्या. अनेक विद्यार्थिनी ‘हेल्मेट’ न घालता दुचाकी चालवत होत्या तर अनेकांच्या कानात ‘हेडफोन्स’ होते. ‘मेट्रो’च्या कामामुळे मार्ग अरुंद झाला असला तरी काही विद्यार्थिनी रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून गप्पा मारत होत्या. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
केडीके महाविद्यालय
केडीके महाविद्यालयातील सर्वाधिक मुले-मुली ट्रिपल सीटचा वापर करीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना किंवा आत जाताना त्यांना कुणीच थांबवित नव्हते. मुख्य रस्त्यावर हे महाविद्यालय असताना केवळ एक टक्का विद्यार्थी सोडल्यास ९९ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट दिसून आले. वाहतुकीचे नियम म्हणजे कायरे भाऊ, असेच काहीसे चित्र होते.
जी.एस.वाणिज्य महाविद्यालय
लॉ कॉलेज चौकातील जी.एस.वाणिज्य महाविद्यालयासमोर दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांकडून खुलेआमपणे वाहतुकीच्या नियमांचे तीनतेरा वाजविण्यात येत होते. अनेक विद्यार्थी ‘ट्रिपल सीट’ आणि तेदेखील ‘राँग साईड’जाताना दिसले तर काही विद्यार्थी चक्क मोटरसायकलचे ‘स्टंट्स’ करीत होते. या रस्त्यावर सकाळपासूनच वर्दळ असते. मात्र बरेच विद्यार्थी रस्त्यावरच वाहने लावून गप्पा मारताना दिसले. आश्चर्याची बाब म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस उभे असतात. मात्र या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसून आली नाही.
धनवटे नॅशनल कॉलेज
काँग्रेसनगर चौकातून धनवटे नॅशनल कॉलेजकडे जाणारे अनेक विद्यार्थी विरुद्ध दिशेने दुचाकी चालविताना दिसले. यात एक टक्काही विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. २५ ते ३० टक्के विद्यार्थी ट्रिपल सीट बसून, मोबाईलचा वापर करीत भरधाव वेगाने महाविद्यालयात प्रवेशद्वारातून आत जात होते. यांना सुरक्षा रक्षकही थांबवित नव्हते. तर दुसºया प्रवेशद्वारातून बाहेर पडणारे विद्यार्थीही एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात अ‍ॅक्सिलेटर दामटत बाहेर पडत होते. कॉलेजच्यासमोर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना वाहतूक पोलीस किंवा मेट्रोचे वाहतूक कर्मचारीही कुठे नव्हते.

Web Title: 'Triple seat' is dear beyond life in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.