त्रिपुराच्या विजयाचा संघाने रचला पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:28 AM2018-03-04T00:28:27+5:302018-03-04T00:28:49+5:30

त्रिपुरा, नागालँड या राज्यांमधील निकालानंतर संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय जरी भाजपाचा असला तरी प्रत्यक्षात येथे पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते.

Tripura's victory,base buildup by the Sangh | त्रिपुराच्या विजयाचा संघाने रचला पाया

त्रिपुराच्या विजयाचा संघाने रचला पाया

googlenewsNext
ठळक मुद्देईशान्येकडील राज्यात शून्याहून केली होती सुरुवात : तरुणांना जोडण्यावर दिला भर

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिपुरा, नागालँड या राज्यांमधील निकालानंतर संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय जरी भाजपाचा असला तरी प्रत्यक्षात येथे पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते. अगदी शून्यापासून सुरुवात करून संघ व भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश आले. या विजयानंतर संघभूमी असलेल्या नागपुरात स्वयंसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ईशान्येकडील राज्यात कार्य केलेल्या प्रचारकांशी संवाद साधून तेथील नेमके कार्य जाणून घेतले.
ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले असून तळागाळापर्यंत तेथील स्वयंसेवक व प्रचारक पोहोचत आहेत. खडतर परिस्थितीत संघ प्रचारकांनी दुर्गम क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती भाजपाला या विजयाच्या रूपात मिळाली. या भागात वाढणारे धर्मांतरण, सीमेवरून होणारी घुसखोरी, शिक्षणाचा अभाव इत्यादी मुद्यांवर संघाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली व यासंदर्भात विविध उपक्रमदेखील राबविले. या मुद्यांवर संघ प्रचारकांनी अगदी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. येथे शाखाविस्तारावरदेखील भर देण्यात आला होता.
सुनील देवधरांचे नागपूर ‘कनेक्शन’
त्रिपुरामध्ये राजकीय पटलावर भाजपाच्या विजयाचे खरे शिल्पकार मानण्यात येत असलेले सुनील देवधर यांचे नागपूरशी ऋणानुबंध जुळले आहेत. संघ प्रचारक म्हणून त्यांनी आमच्यासोबतच कार्य करण्यास सुरुवात केली. समर्पित व्यक्तिमत्त्व असलेल्या देवधर यांनी तेथील लोकांमध्ये विश्वास जागविला. नागपूरच्या मातीचे त्यांच्यावर संस्कार असून आजही ते येथील सहकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहेत.
संघ म्हणताच, व्हायचे दरवाजे बंद
एक काळ होता जेव्हा संघ स्वयंसेवक म्हटले की ईशान्येकडील राज्यांमध्ये नागरिक दरवाजे बंद करायचे. तेथील नक्षलवाद्यांनी अनेक संघ प्रचारकांची हत्यादेखील केली. अशा परिस्थितीतदेखील आसाममधील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर संघ प्रचारकांनी भर दिला होता. चार वर्षांअगोदर आसाममध्ये भडकलेली जातीय हिंसा असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येकवेळी संघ स्वयंसेवक स्थानिक नागरिकांसोबत उभे राहिले व मदतीचा हात दिला. सेवा भारती तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा प्रकल्पासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, अशी माहिती ईशान्येकडील राज्यांत सुमारे १० वर्षे प्रचारक राहिलेले सुनील किटकरु यांनी दिली.
नागपूर,विदर्भातील अनेक प्रचारक कार्यरत
त्रिपुरासह ईशान्येकडील सर्वच राज्यांमध्ये विदर्भ, नागपुरातील अनेक स्वयंसेवक व प्रचारक कार्यरत आहेत. राजेश देशकर हे दक्षिण आसाम प्रांताचे सेवाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी तर हे क्षेत्र अक्षरश: पिंजून काढले व तेथील लोकांमधीलच एक होऊन गेले आहेत.
विद्यार्थी जोडले, शिक्षणावर दिला भर
विद्यार्थी व तरुणांच्या समस्यांवरदेखील संघ पदाधिकारी सातत्याने काम करत होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एकल विद्यालयांचा प्रयोग राबविण्यात आला. ईशान्येकडील राज्यांमध्ये ३०० हून अधिक एकल विद्यालय चालत आहेत. याशिवाय हिंसाग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांवर देशात निरनिराळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्यावेळी संघाने त्यांना मदतीचा हात दिला होता. संघाने विद्यार्थी आणि तरुणांना जोडणे भाजपासाठी खºया अर्थाने फायद्याचे ठरले.

Web Title: Tripura's victory,base buildup by the Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.