तब्बल १९ वर्षांनंतर आला धनत्रयोदशीला त्रिपुष्कर याेग, खरेदी राहणार शुभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 06:45 AM2021-10-29T06:45:00+5:302021-10-29T06:45:01+5:30
Nagpur News २८ ऑक्टोबरपासून गुरु-पुष्य नक्षत्राचा योग आहे. गुंतवणूक आणि खरेदीसाठी तो शुभ असून तब्बल १९ वर्षांनंतर आला आहे. यापूर्वी हा योग २००२ मध्ये आला होता.
नागपूर : मागील वर्षी कोरोनामुळे व्यापाऱ्यांना बरेच नुकसान सोसावे लागले असले तरी यंदा मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर उत्तम योग चालून आला आहे. २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या काळात प्रॉपर्टी, ज्वेलरी, वाहनांच्या खरेदीपासून तर इलेक्ट्रॉनिक सामानांपर्यंतची खरेदी शुभयोगात येत आहे. २८ ऑक्टोबरपासून गुरु-पुष्य नक्षत्राचा योग आहे. गुंतवणूक आणि खरेदीसाठी तो शुभ असून तब्बल १९ वर्षांनंतर आला आहे. यापूर्वी हा योग २००२ मध्ये आला होता.
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर यंदा जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली असून मागील वर्षी कोरोनामुळे सणांच्या उत्साहावर लागलेले ग्रहण सुटल्यासारखे दिसत आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीने तिप्पट लाभ
पं. उमेश तिवारी यांच्या मते, धनत्रयोदशी मंगळवारी सकाळी ९.१० वाजतापासून तर बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. या धनत्रयोदशीला त्रिपुष्कर याेग, हस्त नक्षत्र याेग असेल. खरेदीसाठी या वेळी सकाळी तीन आणि सायंकाळी एक शुभ मुहूर्त आहे. सकाळी ९ ते १०.३० दुसरा मुहूर्त सकाळी १०.३१ ते ११.५९ आणि तिसरा दुपारी १२.०० ते १.३० वाजेपर्यंत असेल. सायंकाळी ५.२१ वाजेपासून ८ पर्यंत खरेदीचा मुहूर्त आहे. शुभयोगातील गुंतवणूक तिप्पट लाभाची मानली जात आहे. त्रिपुष्कर योगातील खरेदी शुभ आणि फायदेशीर मानली जाते.
गुरु-शनीच्या युतीमध्ये पुष्य नक्षत्र
या वर्षी ६७७ वर्षांनंतर हा योग आला आहे. मकर राशीत गुरू आणि शनीची युती असताना हा गुरु-पुष्य संयोग बनतो. यापूर्वी ५ नोव्हेंबर १३४४ मध्ये असा योग आला होता. ग्रंथानुसार, पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी असतो. शनीच्या नक्षत्रात केलेले कार्य दीर्घकाळ चालते.
पुढील ७ दिवस खरेदीसाठी शुभ
दिनांक - शुभयाेग - काय खरेदी करावी
२९ ऑक्टोबर - शुभ आणि गजकेसरी याेग - वाहन, नव्या प्रतिष्ठानाचा प्रारंभ
३० ऑक्टोबर - शुक्ल आणि मानस याेग - फर्निचर, गृहसजावट सामग्री
३१ ऑक्टोबर - ब्रह्मा याेग - वाहन, संयंत्रे
१ नोव्हेंबर - इंद्र आणि श्रीवत्स याेग -इलेक्ट्राॅनिक सामान
२ नोव्हेंबर - त्रिपुष्कर याेग - वाहन, प्राॅपर्टी, ज्वेलरी
३ नोव्हेंबर - सर्वार्थसिद्धी याेग - सजावटी आणि सुख-सुविधांची सामग्री
४ नोव्हेंबर - चतुर्ग्रही याेग - ज्वेलरी खरेदी, प्राॅपर्टीत गुंतवणूक