‘ट्राॅली राेप-वे ब्रिज’ धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:31+5:302021-06-21T04:07:31+5:30
आशिष गाेडबाेले लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : वेकाेलिच्या खाणीतील काेळसा वाहून नेण्यासाठी पूर्वी सावनेर तालुक्यातील इसापूर-पिपळा (डाकबंगला) मार्गाला ...
आशिष गाेडबाेले
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : वेकाेलिच्या खाणीतील काेळसा वाहून नेण्यासाठी पूर्वी सावनेर तालुक्यातील इसापूर-पिपळा (डाकबंगला) मार्गाला छेदून ‘ट्राॅली राेप वे’ तयार करण्यात आला हाेता. ट्राॅलीतील सांडणाऱ्या काेळशामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेकाेलिने या मार्गावर ‘राेप वे’ खाली लाेखंडी सांगाडा लावून पूल तयार केला हाेता. दाेन वर्षांपासून काेळशाची वाहतूक बंद असल्याने या ‘राेप वे’ व त्याच्या लाेखंडी पुलाच्या देखभाव व दुरुस्तीकडे कुणीही लक्ष देत नाही. हा लाेखंडी सांगाडा वाकायला सुरुवात झाली असून, त्या खालून वाहतूक सुरू असल्याने तिथे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
पिपळा (डाकबंगला) (ता. सावनेर) परिसरात वेकाेलिच्या काही काेळसा खाणी आहेत. या सर्व खाणी वेकाेलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया ऑफिसला जाेडल्या आहेत. पाटणसावंगी व पिपळा (डाकबंगला) खाणीतील काेळसा सिल्लेवाडा खाणीकडे वाहून नेण्यासाठी वेकाेलिने या तिन्ही खाणीदरम्यान ‘ट्राॅली राेप वे’ तयार केला. हा ‘ट्राॅली राेप वे’ इसापूर-पिपळा (डाकबंगला) मार्गाला छेदून गेला आहे. ट्राॅलीजील काेळसा खाली पडून अपघात हाेऊ नये, यासाठी या मार्गावर वेकाेलिने ‘ट्राॅली राेप वे’खाली माेठा लाेखंडी सांगाडा लावला आहे. त्या सांगाडा व ‘ट्राॅली राेप वे’च्यामध्ये जाळी लावली आहे.
काेळसा खाणी बंद करण्यात आल्याने काेळशाची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे दाेन वर्षांपासून वेकाेलि प्रशासनाने या ‘ट्राॅली राेप वे’ व आणि त्याखाली असलेल्या लाेखंडी पुलाच्या दुरुस्तीची काेणतीही कामे केली नाहीत. देखभाल व दुरुस्ती अभावी त्या लाेखंडी सांगाड्याचे नट बाेल्ट निघायला, त्या जाड लाेखंडी कमानी वाकायला सुरुवात झाली आहे. या कमानी कधी काेसळेल आणि अपघात हाेईल, याचा भरवसा नाही. संभाव्य धाेका व अपघात टाळण्यासाठी वेकाेलिच्या सिल्लेवाडा सब एरिया ऑफिसने या लाेखंडी सांगाड्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रया राहुल ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
....
देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
दाेन वर्षांपासून पाटणसावंगी व पिपळा (डाकबंगला) या खाणीतील काेळशाचे उत्पादन बंद असून, या दाेन्ही खाणी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ‘ट्राॅली राेप वे’वरून हाेणारी काेळशाची वाहतूकही बंद झाली आहे. परिणामी, या काळात वेकाेलि प्रशासनाने या ‘ट्राॅली राेप वे’च्या देखभाल व दुरुस्तीकडे मुळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या ‘ट्राॅली राेप वे’च्या खालचा लाेखंडी सांगाडा वाकायला सुरुवात झाली आहे.
...
वर्दळीच्या मार्गावर वाहतूक काेंडी
इसापूर-पिपळा (डाकबंगला) हा मार्ग सतत वर्दळीचा आहे. या मार्गावरून रेतीसह अन्य जड व ओव्हरलाेड वाहतूक सतत सुरू असते. इसापूर, पिपळा (डाकबंगला), गाेसेवाडी येथील शेतकरी शेतीची वहिवाटी व शेतमालाच्या वाहतुकीसाठी या मार्गाचा नियमित वापर करतात. सांगाड्याच्या लाेखंडी कमानी वाकल्याने त्याखालून माेठी व उंच वाहने काढताना अडचणी निर्माण हाेतात. यासाठी वेळ लागत असल्याने येथे अधूनमधून वाहतूक काेंडीही हाेते.
===Photopath===
200621\img_20210620_143546.jpg
===Caption===
फोटो -इसापूर -पिपळा डाकबंगला मार्गावरील वेकोलि निर्मित जीर्ण लोखंडी ब्रीज