रुग्णाच्या मृत्यूला घेऊन नागपूरच्या मेडिकल इस्पितळामध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:56 PM2018-01-13T22:56:39+5:302018-01-13T22:58:37+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेडिकल)सर्जरी कॅज्युल्टीमध्ये शनिवारी सायंकाळी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेडिकल)सर्जरी कॅज्युल्टीमध्ये शनिवारी सायंकाळी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्यांना बाहेरच थोपविण्यासाठी कॅज्युल्टीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रेशीमबागस्थित मेहंदी लॉनजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर टक्कर झाली. यात महाल दसरा रोड निवासी शेख अदीम व सय्यद अरशद जखमी झाले. या दोघांना मेडिकलच्या सर्जरी कॅज्युल्टीमध्ये साधारणत: ३.४० वाजता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शेख अदीम याचा मृत्यू झाला तर सय्यद अरशद यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येते. सध्या त्याच्यावर मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अदीम याच्या मृत्यूला घेऊन नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी उपचाराच्या वेळी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हते, जेव्हा त्यांना बोलविण्यात आले तेव्हा त्यांनी सहकार्य केले नाही, उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळेच अदीम यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान मृताचे नातेवाईक मोठ्या संख्येत सर्जरी कॅज्युल्टीबाहेर जमा होऊन गोंधळ घालू लागले. गोंधळ एवढा वाढला की सुरक्षारक्षकांना कॅज्युल्टीचे सर्व प्रवेशद्वार बंद करावे लागले. यादरम्यान सामान्य व्यक्तीच नव्हे तर रुग्णालाही कॅज्युल्टीमध्ये प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना मेडिसीन कॅज्युल्टीमधून यावे लागले. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पुन्हा कॅज्युल्टीचे द्वार सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
गोंधळाची माहिती नाही
रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्जरी कॅज्युल्टीमध्ये गोंधळ घातला व त्यांना थोपविण्यासाठी प्रवेशद्वार बंद करण्यात आले, अशी कुठलीही माहिती मिळालेली नाही. परंतु तरीही चौकशी केली जात आहे.
-डॉ. राजेश गोसावी
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल