एफसीआयच्या कार्यकारी संचालकांना तंबी
By admin | Published: February 28, 2015 02:25 AM2015-02-28T02:25:56+5:302015-02-28T02:25:56+5:30
वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे.
नागपूर : वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे.
यासंदर्भात वारंवार वेळ देऊनही उत्तर सादर न केल्यामुळे ‘एफसीआय’च्या पश्चिम विभागीय कार्यकारी संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक आदेश जारी करून तंबी दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, कार्यकारी संचालकांना उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ११ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत उत्तर सादर न केल्यास त्यांना न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून आदेशाच्या अवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. याप्रकरणाची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालयीन मित्र आहेत.
नागपूर येथील फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातील कामगारांच्या संघटनेने संपाची भीती दाखवून हमालांचे वेतन व इतर भत्ते अव्वाच्यासव्वा वाढवून घेतले आहेत. यामुळे शासकीय निधीचे नुकसान होत आहे. अधिकारी यासंदर्भात मूग गिळून गप्प आहेत. चांगली कमाई करणारे हमाल ७ ते ८ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे भाड्याने कामगार आणतात. वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे हमालांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. यामुळे त्यांचे वेतन लाखो रुपयांनी वाढते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेतील प्रतिवादींमध्ये केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव, एफसीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि महाराष्ट्र माथाडी हमाल मंडळ यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)