तो ट्रक सापडला, चोरही गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:29 PM2020-10-20T23:29:07+5:302020-10-20T23:30:05+5:30

Truck Stolen from Police Station case Detected, Crime News दोन दिवसांपूर्वी चोरीची जाहीर वाच्यता करून एका चोरट्याने पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरून नेला. पोलिसांना लाजेने मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेला ३६ तास झाल्यानंतर पोलिसांनी तो ट्रक आणि चोरटा अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चोरट्याचा अट्टहास अन् पोलिसांचा निष्काळजीपणाही उघड झाला.

That truck and the thief found | तो ट्रक सापडला, चोरही गवसला

तो ट्रक सापडला, चोरही गवसला

googlenewsNext

 

हे खूपच झाले!  उघड झाला अट्टहास अन् निष्काळजीपणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन दिवसांपूर्वी चोरीची जाहीर वाच्यता करून एका चोरट्याने पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरून नेला. पोलिसांना लाजेने मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेला ३६ तास झाल्यानंतर पोलिसांनी तो ट्रक आणि चोरटा अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चोरट्याचा अट्टहास अन् पोलिसांचा निष्काळजीपणाही उघड झाला.

शहरात संजय ढोणे नावाचा अट्टल चोरटा राहतो. त्याने आतापर्यंत चोरी-घरफोडीचे ३५ गुन्हे केले आहेत. त्यातील २५ गुन्हे ट्रक चोरीचे आहेत. कोणताही ट्रक, कुठेही असो तो चोरून नेतो. १० दिवसांपूर्वी त्याने असाच लकडगंजच्या स्मॉल फॅक्टरी एरियातून ट्रक चोरून नेला. त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संजय ढोणेला अटक करून लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ट्रक जप्त करून ढोणेला अटक केली. जप्त केलेला ट्रक लकडगंज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला. तिकडे ढोणे जामिनावर बाहेर आला आणि त्याने त्याची प्रतिज्ञा जाहीर केली. पुन्हा हाच ट्रक चोरून नेईन, असे तो इकडे तिकडे सांगत सुटला. दारूच्या नशेत बरळत असावा, असे समजून त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. (त्याची काय हिम्मत आहे, असे समजून पोलीस गुर्मीत राहिले, असेही आता बोलले जात आहे.) मात्र, नंतर जे काही झाले ते पोलिसांचे नाक कापण्यासारखे झाले. सोमवारी भल्या सकाळी ५.३० ला ढोणे याने लकडगंज पोलीस ठाणे गाठले. ट्रकमध्ये ट्रकचालक संतोष पांडे झोपून होता. त्याला कंबरेत हात टाकून काहीतरी काढण्याची हूल दिली. धक्का मारून केबिनमधून बाहेर काढले अन् ट्रक घेऊन पळून गेला. पुढच्या काही क्षणात पांडे पोलीस ठाण्यात होता. त्याने तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही घटना सांगितली. ढोणेची प्रतिज्ञावजा अट्टहास पूर्ण झाला. त्याने तो २० टन लोखंडी सळाखी भरलेला ट्रक कळमेश्वरमध्ये उभा केला अन् काटोलमध्ये जाऊन टुन्न होऊन पडला. राज्यातील सर्वात पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन समजल्या जाणाऱ्या लकडगंजमधून चोरीची घोषणा करून ढोणेने ट्रक चोरून नेला.

ढोणेने हायटेक यंत्रणा फेल पाडली

विशेष म्हणजे, ट्रकचालकाला धमकावून त्याच्या देखत तो ट्रक घेऊन पळाला. अर्थात् ही घटना घडल्याबरोबरच पोलिसांना ती माहीत झाली. नागपुरात साडेतीन हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही असताना, घटनेच्या काही वेळेनंतर तो गोरवाडा चौकातून ट्रक घेऊन जाताना दिसत असतानादेखील ढोणेला शोधून काढण्यासाठी पोलिसांना ३६ तास लागले. मंगळवारी दुपारी कळमेश्वरमध्ये ट्रक सापडला तर सायंकाळी ढोणे हाती लागला. त्याला घेऊन पोलीस नागपुरात आले.

पीएसआय वापरतो चोरीची अ‍ॅक्टिव्हा !

दुसरी घटनाही अचंबित करणारीच आहे. औरंगाबादला चोरी झालेली एक अ‍ॅक्टिव्हा नागपुरात सापडली. गुन्हे शाखेने ती जप्त केल्यानंतर पथक प्रमुख असलेल्या पीएसआयने दुचाकीमालकाला निरोप पाठवला. त्यामुळे दुचाकीधारक नागपुरात पोहचला. त्याने आपली दुचाकी ओळखली अन् ती नेण्यासाठी परवानगी मागितली. पीएसआयने मात्र दुचाकीच्या बदल्यात नगदी रक्कम मागितली. ती देण्यास असमर्थता दाखवल्याने दुचाकीमालकाला हुसकावून लावले आणि ती आपली मालमत्ता आहे, अशा थाटात दुचाकी स्वत:कडे ठेवून घेतली. दोन महिन्यांपासून ही दुचाकी तो पीएसआय वापरत आहे. त्याच्या मोटरसायकलच्या बाजूलाच तो ही चोरीची (हडपलेली) अ‍ॅक्टिव्हा आपल्या शासकीय बंगल्यात ठेवतो.

 

त्यांना कोण घडविणार अद्दल

ट्रक चोरट्याला पोलीस नक्की आणि मोठी अद्दल घडविणार, हे कुणी सांगायची गरज नाही. त्या चोरट्याला अद्दल घडवायलाही पाहिजे. मात्र, चोरीची दुचाकी हडपून पोलिसांच्या प्रामाणिकपणावर चिखल उडविणाऱ्या पीएसआयला कोण आणि कशी अद्दल घडविणार, असा प्रश्न आहे.

Web Title: That truck and the thief found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.