दुचाकीला धडक देऊन नदीत ट्रक कोसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:11 PM2018-02-09T12:11:52+5:302018-02-09T12:14:16+5:30
उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला.
घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी उमरेड नागपूर महामार्गावर आपला संताप व्यक्त केला.
जयसिंग यादव (४६, रा. वायगाव घोटुर्ली) असे जखमीचे नाव आहे. जयसिंग यादव यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. वेकोलि येथून उमरेडकडे एमएच-३४/डीजी-१५१४ क्रमांकाचा ट्रक जात होता. अशातच समोरून येणाऱ्या एमएच-४०/एव्ही-६५१५ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यानंतर ट्रक आमनदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये ट्रकचालक थोडक्यात बचावला. तेथून ट्रकचालक कसाबसा बाहेर निघून पसार झाला. याबाबत उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हे आधी करा
तुटलेले संरक्षक कठडे आणि जीर्ण झालेल्या पुलाला शंभर वर्षापेक्षाही अधिक काळ लोटलेला आहे. शिवाय तुटलेले कठडे धोकादायक वाटतात. या पुलावरून प्रवास करताना दुचाकी - चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. नागपूर-उमरेड चारपदरी होईल तेव्हा होईल; पण आधी या पुलाच्या कठड्यांचे तसेच डागडुजीचे काम करा आणि अशा अपघातांना आळा घालावा, अशी मागणी उमरेड येथील नागरिकांनी केली आहे.