ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले
By admin | Published: February 9, 2017 02:54 AM2017-02-09T02:54:16+5:302017-02-09T02:54:16+5:30
सदर पोलीस ठाण्यासमोर एका अनियंत्रित ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले.
एफसीआय आयुक्तांच्या मुलीचा मृत्यू : मित्रही गंभीर जखमी
नागपूर : सदर पोलीस ठाण्यासमोर एका अनियंत्रित ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले. या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा वर्गमित्र जखमी झाला. या अपघाताने सदर पोलीस ठाणेही हादरले. अपर्णा राजू अंभोरे (१७) रा. जयहिंद नगर मानकापूर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
ती हिस्लॉप कॉलेजमध्ये अकरावीला शिकत होती. ती आपल्या सहकारी मित्रासोबत बुधवारी दुपारी ३.३० वाजता अॅक्टीव्हाने घराकडे जात होती. अॅक्टीव्हा अपर्णाचा वर्गमित्र चालवित होता. सदर पोलीस ठाण्यासमोर आयशर ट्रकने (एम.एच./४०/एन/४३१०) च्या चालकाने अॅक्टीव्हाला मागून धडक दिली. या धडकेमुळे दोघेही अॅक्टीव्हासह खाली पडले. अपर्णा ट्रकच्या समोर तर तिचा मित्र विरुद्ध दिशेने पडला. अपर्णा ट्रकमध्ये सापडल्याने ती गंभीर जखमी झाली.
ठाण्यासमोरच अपघात झाल्याने पोलीस कर्मचारीही मदतीसाठी धावले. त्यांनी अपर्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मित्रही जखमी झाला. तो हा अपघात पाहून घाबरून गेला. अपर्णाचे वडील भारतीय खाद्य महामंडळात आयुक्त आहेत. ते मुंबईत कार्यरत आहेत. अपर्णाच्या कुटुंबात आई जया, मोठी बहीण मनीषा आणि लहान भाऊ अभिषेक आहेत. जया गृहिणी आहे. मनीषा बारावीची विद्यार्थिनी आहे. या घटनेमुळे अंभोरे कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
अपर्णा ही हुशार विद्यार्थिनी होती. घटनेच्यावेळी ती वर्गमित्रासोबत घरी परतत होती. प्रत्यक्षदर्शीनुसार अॅक्टीव्हाची गती सामान्य होती तर ट्रक भरधाव वेगाने होता. ट्रक चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवीत अपर्णाला चिरडले. सदर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक संतोष बकाराम राऊत (२१) वडधामना याला अटक केली आहे.(प्रतिनिधी)
जीवाशी खेळताहेत चालक
जड वाहन चालविणारे वाहन चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. लोकमतने काही दिवसांपूर्वीच नवशिके चालक जड वाहन चालवीत असल्याचा खुलासा केला होता. सहा महिने किंवा एक वर्षाच्या अनुभवानंतरच जड वाहन चालवण्यासाठी दिले जातात. कमी पगारात अधिक काम घेण्यासाठी वाहन मालक असे करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या हातून अपघात होतात. अपर्णाला चिरडणारा चालकही नवशिक्या होता.