नागपुरात तडीपार गुंडाकडून ट्रकचालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:49 PM2018-04-12T22:49:52+5:302018-04-12T22:50:12+5:30
प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली.
विजय बहादूर यादव (वय २५) असे मृताचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील रहिवासी होता.
रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात काही वर्षांपूर्वी आलेला विजय येथील कामगार नगरात राहत होता.
नारा रिंग रोडवरील एका मार्बलच्या दुकानात तो वाहनचालक म्हणून काम करत होता. तर, त्याची हत्या करणारा आरोपी डॅनी ऊर्फ सागर यादव शांतिनगरातील रहिवासी आहे. डॅनी कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला चार महिन्यांपूर्वी नागपुरातून तडीपार करण्यात आले होते.
विजयची मैत्रीण गंगाजमुनात राहते. याच रिंगरोडवर एका ठिकाणी आरोपी डॅनीचीही प्रेयसी राहते. तिला भेटण्यासाठी डॅनी गुरुवारी पहाटे २ नंतर तिच्या घराजवळ आला. ठरल्याप्रमाणे त्याची प्रेयसी घराजवळच रस्त्याच्या कडेला आली. ती आणि डॅनी गप्पा करीत असताना पहाटे २.३० च्या सुमारास तेथून विजय जाऊ लागला. डॅनीसोबत तरुणी बोलत असल्याचे पाहून विजयचा गैरसमज झाला. ती गंगाजमुनातील देहविक्रय करणारी तरुणी असावी, असा गैरसमज झाल्याने तो तिच्याकडे एकटक पाहत उभा राहिला. ते पाहून आरोपी डॅनीने त्याला हटकले. काय आहे, असे विचारले. विजयनेही त्याला तुझे काय आहे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. डॅनीने शिवीगाळ केल्यामुळे विजयनेही त्याला शिवीगाळ केली. प्रेयसीसमोर अपमान झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॅनीने जवळचा चाकू काढून विजयच्या कंबरेखाली घाव घातले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी डॅनी आणि त्याची प्रेयसी पळून गेले.
सीसीटीव्हीतून उलगडा
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लकडगंजचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. मृताची किंवा मारेकऱ्याची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात हत्येचे सर्व शुटिंग पोलिसांच्या हाती लागले. आरोपीच्या छायाचित्रावरून त्याची ओळखही पटली. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढून त्याला अटक केली. या घटनेमुळे तडीपार गुंड शहरातच वास्तव्याला असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.