ट्रकने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:45 PM2018-10-01T21:45:37+5:302018-10-01T21:46:24+5:30
भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश दाते (२४, रा. हिंगणा) असे मृताचे नाव असून, जखमी तरुणीचे नाव कळू शकले नाही. दोघेही एमएच-४०/एएल-५१६९ क्रमांकाच्या मोटरसायकने कळमेश्वरहून सावनेरला जात होते. ते वरोडा शिवारातील वळणावर पोहोचताच सावनेरहून कळमेश्वरकडे वेगात येणाºया ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली आणि निघून गेला.
त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्यांना कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णलयात आणले. तिथे डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर प्रथमोपचार करून तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दहा दिवसात नऊ जण ठार
वरोडा शिवारातील ‘ते’ वळण कर्दनकाळ ठरले आहे. कारण त्या वळणावर गेल्या दहा दिवसातील हा तिसरा अपघात होय. तिन्ही घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले. या ठिकाणी २० सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जखमी झाले. दुसºया दिवशी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सोमवारी (दि. १) झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तरुणी जखमी झाली.