नागपुरातून चोरी गेलेला ट्रक सूरतमधून जप्त, तीन आरोपींना अटक
By योगेश पांडे | Published: June 6, 2023 05:10 PM2023-06-06T17:10:48+5:302023-06-06T17:11:40+5:30
सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून काढला माग : गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेला ट्रक थेट गुजरातमधील सूरतमधून ताब्यात घेण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने केलेल्या या कारवाईत सूरतमधील एका आरोपीसह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात आला.
३० मे रोजी भरत नगर चौकातून धीरज महेंद्र ठवरे (४०, हिवरीनगर) यांचा एमएच ४० वाय २७११ हा १० चाकी ट्रक चोरी गेला. त्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावर गुन्हे शाखेकडूनदेखील समांतर तपासाला सुरुवात झाली. परिसरातील सीसीटीव्ही, टोलबुथवरील सीसीटीव्ही व इतर ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून ट्रक गुजरातमधील सूरतकडे गेल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हे शाखेच्या पथकाने सूरतला जाऊन गयासउद्दीन वहाजुद्दिन कुरेशी (४६, पलसाना, सूरत, गुजरात) याला अटक केली. त्याच्याजवळच ट्रक आढळला. त्याची चौकशी केली असता संजय बाबुलाल बिनकर (४०, सुरेंद्रगड, गिट्टीखदान), अजय चंदनलाल श्रीवास (४४, मोतीबाग, पाचपावली) यांच्या मदतीने ट्रक चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनादेखील अटक केली. त्यांच्याकडून ट्रक, एक कार व मोबाईल असा १०.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना कळमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, राजेन्द्र गुप्ता, दिपक ठाकरे, बबन राऊत, सुशांत सोळंके, नितेश तुमडाम, सोनू भावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली