ट्रक चोरणारी आंतरराज्यीय टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:52 PM2019-01-02T23:52:17+5:302019-01-02T23:55:21+5:30
मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींमध्ये संतोष ऊर्फ कुबड्या मुलचंद अहिरवार (४६) सागर व कलिराम श्रीवास (४५) रा. परासिया, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
आरोपी बऱ्याच काळापासून मध्य प्रदेश व महाराष्ट्रात ट्रक चोरी करीत होते. संतोष १५ वर्षांपासून नंदनवन येथील हिवरीनगर येथे राहत होता. तो कलिराम याच्यासोबत ट्रक चोरी करीत होता. संतोष मास्टर चावीच्या माध्यमातून ट्रक अथवा अन्य वाहन चोरतो. कलिराम शहरात फिरून ट्रकवर नजर ठेवतो. संतोष ट्रक चोरून कलिराम याच्या स्वाधीन करीत होता. कलिराम त्याची मध्य प्रदेशात विक्री करीत होता. ट्रान्सपोर्टर अथवा कबाडी व्यावसायिक त्याचे खरेदीदार होते.
कलिरामची मध्य प्रदेशात दहशत आहे. मध्य प्रदेश पोलीस त्याच्या शोधात आहे. सतलापूर पोलिसांनी त्याच्यावर पाच महिन्यापूर्वी पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ४ डिसेंबरच्या रात्री पाचपावली ठाण्याच्या परिसरात राहणारे राजेंद्र धकाते यांची दुचाकी चोरीला गेली. याचा तपास करताना पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. गुन्हे शाखा पोलीस त्यांचा शोध घेत होती. पोलीस गस्त देत असताना दोघाही चोरीच्या ट्रकसोबत सापडले. चौकशी केल्यावर त्यांनी ट्रक मध्य प्रदेशच्या सतलापूर येथून चोरल्याचे कबूल केले. त्यांनी धकातेची दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्या आधारावर त्यांच्यावर पाचपावली पोलिसांनी त्यांना चोरीच्या प्रकरणात अटक केली. या दोघांनी मध्य प्रदेशात सात ट्रकांची चोरी केली आहे, तर शहरात वाहन चोरी, बॅटरी चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा केला आहे. आरोपींना भोपाळ पोलीस ताब्यात घेणार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत, एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर, एपीआय मंगला मोकासे, एएसआय राजेंद्र बघेल, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेश ठवरे, अनिल दुबे, सुरेश हिंगणेकर, श्याम कडू, अतुल दवंडे, फिरोज शेख तसेच शरीफ शेख यांच्याकडून करण्यात आली.
ट्रान्सपोर्टर, कबाडी व्यावसायिकांशी संपर्क
यापूर्वी २०१४ व २०१७ मध्ये नागपूर पोलिसांनी त्यांना पकडून मध्य प्रदेश पोलिसांना सोपविले होते. आरोपींकडून सक्तीने विचारणा केल्यावर त्यांच्याशी जुळलेल्या ट्रान्सपोर्टर व कबाडी व्यावसायिकाचे नाव पुढे येऊ शकतात. शहरातील काही ट्रान्सपोर्टर चोरीच्या वाहनांची हेराफेरी करण्यात लिप्त आहेत. कबाडी व्यावसायिकसुद्धा चोरीचे वाहन खरेदी करून मालामाल होत आहेत.