दादासाहेब दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार
By admin | Published: August 13, 2015 03:44 AM2015-08-13T03:44:04+5:302015-08-13T03:44:04+5:30
दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले.
रा.सू. गवई यांना आदरांजली : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले. त्यामुळे दिवंगत रा.सू. गवई हेच दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आपली आदरांजली व्यक्त करतांना ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले अध्यक्षस्थानी होते तर बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, पीरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, आ. नाना श्यामकुळे, बसपाचे मुरलीधर मेश्राम, माकपाचे अजय शाहू प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, दादासाहेब गवई यांचे व्यक्तिमत्त्व हे विलक्षण होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. बिहारचे राज्यपाल असतांना त्यांनी तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात मोलाचे कार्य केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सदानंद फुलझेले यांनी दिवंगत दादासाहेब गवई यांच्यामुळेच दीक्षाभूमीवरील जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकल्याचे सांगितले. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, दत्ता मेघे, प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. नितीन राऊत, रमेश बंग, अजय शाहू यांनीही दिवंगत रा.सू. गवई यांच्या आठवणींना उजाळा देत आपली आदरांजली व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या आदरांजलीचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुरुवातीला सर्वांना बुद्ध वंदना ग्रहण केली. प्रास्ताविक आ. नाना श्यामकुळे यांनी केले. संचालन विलास गजघाटे यांनी केले. (प्रतिनिधी)
रिपब्लिकन ऐक्याचे आवाहन
दिवंगत रा.सू. गवई यांनी रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे पुन्हा रिपाइंचे ऐक्य व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी यांच्यासह डॉ. नितीन राऊत, सुलेखा कुंभारे, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. तसेच यावेळी दत्ता मेघे यांनी दीक्षाभूमीवर दिवंगत रा.सू. गवई यांचा पुतळा उभारण्याची विनंती केली. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिवंगत गवई यांचे स्मारक किंवा पुतळा उभारण्यासंबंधी सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा. यात केंद्र व राज्य सरकार नेहमीच सहकार्य करेल. परंतु त्यात कुठलाही वाद होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी विनंती सुद्धा केली.