भारताच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे खरे योगदान : जी. डी. बक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:21 PM2019-05-28T22:21:17+5:302019-05-28T22:23:22+5:30
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचे २६ हजार सैनिक शहीद झाले. त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला ‘विना खड्ग, विना ढाल’ स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्यात येते. असे म्हणताना आम्हाला शरम वाटली पाहिजे, असे प्रतिपादन मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचे २६ हजार सैनिक शहीद झाले. त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला ‘विना खड्ग, विना ढाल’ स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्यात येते. असे म्हणताना आम्हाला शरम वाटली पाहिजे, असे प्रतिपादन मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूरच्या वतीने लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात स्वा. सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार पुरुषोत्तम मार्तंडराव उपाख्य बापू जोग आणि मीना जोग तसेच तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार जिज्ञासा कुबडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वा. सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे होते. व्यासपीठावर डॉ. अजय कुळकर्णी, सत्कारमूर्ती पुरुषोत्तम उपाख्य बापू जोग, मीना जोग, जिज्ञासा कुबडे उपस्थित होत्या. मेजर जनरल जी. डी. बक्षी म्हणाले, इंग्रजांनी भारतीयांना जाती-धर्मात विभागले. भारताने ८०० वर्षे गुलामगिरी सहन केली. शिवाजी महाराजांनी मुगलसाम्राज्य उखडून फेकले. राणी लक्ष्मीबार्इंनी हातात तलवार घेऊन शत्रूंचा बीमोड केला. अखेर इंग्लंडच्या राणीला त्यांच्याच सैन्याने पत्र लिहून आझाद हिंद सेनेमुळे भारतापुढे आपला टिकाव लागणार नसल्याची ताकीद दिली. याची इतिहासात नोंद आहे. इंग्रजांनी भारतात सत्तेचे हस्तांतर नेहरू घराण्यास केले. खरे पाहिले तर आझाद हिंद सेनेकडे भारताची सत्ता सोपवायला हवी होती. सत्तेवर येताच पहिला गव्हर्नर इंग्रज नेमण्यात आला. त्याने आझाद हिंद सेनेवर बंदी घालून त्यांना सैन्यात येण्यास मनाई केली. त्यांची पेन्शन रोखली. आजपर्यंतच्या ७२ वर्षातील निवडणुका जातीच्या आधारावर झाल्या. परंतु पहिल्यांदा भारतात राष्ट्रवादावर निवडणुका झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद हिंद सेनेच्या चार जवानांचा राजपथावर सत्कार केला.सावरकरांचे अखंड भारताचे स्वप्न आज साकार होत असल्याचे बक्षी म्हणाले. सत्काराला उत्तर देताना बापू जोग यांच्यावतीने वि. स. जोग म्हणाले, सावरकरांचे लहानपणापासून संस्कार झाले. त्यांच्या विचारांमुळेच आंतरजातीय विवाह केला. पुढील महिन्यात विवाहाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे श्रेय पत्नी आणि आईला जाते. जिज्ञासा कुबडे म्हणाल्या, सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. समाजकार्यात कुटुंबीय, समाजातील नागरिकांनी मदत केली. समाजाने दिव्यांगांची क्षमता ओळखून त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अजय कुळकर्णी यांनी केले. संचालन डॉ. दिनेश खुर्गे यांनी केले. आभार अनिल देव यांनी मानले. कार्यक्रमाला आमदार डॉ. अनिल सोले, उपेंद्र कोठेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.