आमच्या एका हातात तुतारी अन् दुसऱ्या हातात मशाल, नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

By कमलेश वानखेडे | Published: February 23, 2024 07:48 PM2024-02-23T19:48:33+5:302024-02-23T19:48:49+5:30

या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिला. 

Trumpet in one hand and torch in the other hand, Nana Patole's warning to BJP | आमच्या एका हातात तुतारी अन् दुसऱ्या हातात मशाल, नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

आमच्या एका हातात तुतारी अन् दुसऱ्या हातात मशाल, नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

नागपूर : महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे, परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. 

आता तर आमच्या एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी आहे. हा भाजपाच्या तानाशाहीला संदेश आहे.  या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे. 

भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतले, अशी टीका त्यांनी केली.

जेवढे घ्यायचेय तेवढे घेऊ द्या...
बरेच नेते काँग्रेस पक्ष सोडत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले पटोले म्हणाले,  सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या, त्यांच्या पक्षातील कितीजण आमच्या संपर्कात आहेत याची त्यांना कल्पना नाही. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Trumpet in one hand and torch in the other hand, Nana Patole's warning to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.