वर्तमानपत्रांनी टिकविली विश्वसनीयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:26 PM2019-03-25T13:26:59+5:302019-03-25T14:42:48+5:30

वर्तमानपत्रांनी तर मुद्रित चेहऱ्यासोबतच ‘ऑनलाईन’वरदेखील आपली छाप सोडली आहे. मात्र समाजाप्रति असलेली मूळ भूमिका मात्र बदललेली नाही आणि वाचकांच्या मनात विश्वसनीयता कायम ठेवली आहे, असे मत ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी व्यक्त केले.

Trustworthiness in society secured by newspapers | वर्तमानपत्रांनी टिकविली विश्वसनीयता

वर्तमानपत्रांनी टिकविली विश्वसनीयता

Next
ठळक मुद्देरायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘मीडिया’चे अंतरंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होत आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच प्रसारमाध्यमांसमोरदेखील काही आव्हाने उभी ठाकली आहे. ‘ऑनलाईन’चे चलन वाढत आहे व त्यादृष्टीने प्रसारमाध्यमांमध्ये बदलदेखील होत आहेत. विशेषत: वर्तमानपत्रांनी तर मुद्रित चेहऱ्यासोबतच ‘ऑनलाईन’वरदेखील आपली छाप सोडली आहे. मात्र असे असले तरी समाजाप्रति असलेली मूळ भूमिका मात्र बदललेली नाही आणि वाचकांच्या मनात विश्वसनीयता कायम ठेवली आहे, असे मत ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी व्यक्त केले. शनिवारी ‘जीएचआरआयएमआर’तर्फे (जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च) ‘बी युअर गेस्ट’ या उपक्रमांतर्गत ‘सुशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
श्रद्धा हाऊसस्थित विवेकानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘जी.एच.रायसोनी स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’चे संचालक डॉ. विजय बिडवईकर, ‘जीएचआरआयएमआर’च्या संचालिका डॉ.मीना राजेश प्रामुख्याने उपस्थित होते. देशाची लोकशाही मजबूत करण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे. सुशासन स्थापित व्हावे व ते वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रसारमाध्यमांची मौलिक भूमिका आहे. मानवाधिकारांच्या रक्षणात प्रसारमाध्यमांनी मोठे कार्य केले आहे. मागील काही काळात वर्तमानपत्रांनी अनेक प्रकरणे समोर आणली. त्यामुळेच प्रशासनाला कारवाई करावी लागली आणि पीडितांना न्याय मिळू शकला, असे ऋषी दर्डा यांनी प्रतिपादन केले. प्रत्येक वर्तमानपत्र समूहाचा स्वत:चा एक ‘डीएनए’ असतो. वर्तमानपत्रांच्या विचारांची दिशा ही संपादकीयमधून समोर येत असते व ही बाब आवश्यक आहे. असे असले तरी प्रसारमाध्यमांसाठी वाचक तसेच दर्शकांचे मतं हे अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्यांच्या अपेक्षेनुसारच बदल होतात. ‘लोकमत’ने नेहमीच वाचकांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. वाचकांच्या अपेक्षेनुसार आम्ही स्वत:ला ‘अपग्रेड’ करत गेलो. त्यामुळेच लोकांचादेखील आमच्यावर तेवढाच जिव्हाळा आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे दिली. डॉ. विजय बिडवईकर यांनी संचालन केले.

समाजात सकारात्मक बदल घडविणे शक्य
आजचे तरुण हे सजग आहेत व ते प्रत्येक गोष्टीची पारख करतात. पालकांनी एखादी गोष्ट सांगितली तरी ‘गुगल’च्या माध्यमातून ते तिची चाचपणी करतात. त्यामुळेच वर्तमानपत्रे कुठलीही बातमी छापण्याअगोदर तिची खातरजमा करतात. आज समाजात विविध प्रकारची नकारात्मकताआहे. अशा स्थितीत वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य आहे व त्यासाठी तसा पुढाकार घेतलाच गेला पाहिजे, असे ऋषी दर्डा म्हणाले. प्रसारमाध्यमांचे व्यावसायिकीकरण झाले आहे व स्पर्धेच्या युगात ते गैर नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी नीतिमत्तेची लक्ष्मणरेखा आखूनच काम करायला हवे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: Trustworthiness in society secured by newspapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.